पुणे प्रतिनिधी :
दि. १३ एप्रिल २०२४
सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशीच बारामतीतील प्रमुख लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 19 एप्रिल ही बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
राज्यातील सर्वांत ‘हाय व्होल्टेज’ लढत बारामतीत रंगलेली आहे. नणंद-भावजयीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे, या निवडणूक लढवत आहेत. पवार आणि सुळे या दोघी येत्या गुरुवारी (ता. १८ एप्रिल), अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढतीसाठी आपला उमेदवारी अर्ज पुण्यात भरणार आहेत.
दोन्ही उमेदवारांकडून, उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. बारामतीसोबतच, महायुतीच्या पुणे आणि शिरूर या मतदारसंघांचे उमेदवारही अनुक्रमे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या गर्दीमुळे पुण्याचे राजकीय वातावरण तापणार आहे कारण, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या तीन नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची पुण्यात जाहीर सभाही होणार आहे.
सध्या प्रचाराचा धुराळा बारामती लोकसभा मतदारसंघात उडत आहे. प्रचार सभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी तसेच प्रत्यक्ष संवाद दोन्ही उमेदवारांकडून साधला जात आहे. तसेच, उमेदवार आपला प्रचार, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रांच्या माध्यमातून करत आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापरही दोन्ही गटांकडून होताना दिसत आहे.
कोण कोणते स्टार प्रचारक महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बारामतीत सभा घेणार आहेत, याची उत्कंठा सर्वांना आहे. पाच मे रोजी बारामतीतील प्रचाराची सांगता होणार आहे. साहजिकच उर्वरित २० दिवसांत या मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार आहे.