बारामती प्रतिनिधी :
दि. १३ एप्रिल २०२४
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार यांच्यातील लढत चांगलीच रंगते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत बारामतीकरांनी लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या. जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या या आवाहनाला शरद पवार यांनी खोचकपणे प्रत्युत्तर दिले होते.
शरद पवार म्हणाले होते, “बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभं राहायला हवे, हे बरोबर आहे. पण दोन गोष्टी असतात. एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार!” राष्ट्रवादी अजित पवार गटातील महिला त्यानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाल्या होत्या.
सुनेत्रा पवार यांना शरद पवारांच्या या विधानवर विचारले असता त्यांना अश्रू अनावर झाले. उत्तर न देताच डोळ्यांना रुमाल लावत त्या निघून गेल्या. या प्रश्नामुळे सुनेत्रा पवार भावनिक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे बोलता न आल्याने कोणतेही उत्तर देण्याचे टाळत त्या निघून गेल्या.
अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारीच नाही तर शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनीदेखील शरद पवार यांच्या विधानवरून ट्विट करत शरद पवारांवर टीका केली. ‘आमच्या महाराष्ट्रात सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे, तुम्ही कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, राजकारणासाठी तुमचे विचार बदलले…बारामतीच्या काकांचं हे वाक्य, समस्त महाराष्ट्रातल्या, लग्न करून सासरी गेलेल्या सुनांचा अपमान आहे’, शीतल म्हात्रे यांनी असं ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला.