शिरूर प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. हे उमेदवार आपल्या विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच महायुतीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली आहे आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर! सध्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, परंतु संकटमोचक स्वतःच सध्या संकटात आहेत, हवा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यामुळे ते करत आहेत,असा शेरा आढळरावांनी मारला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी या मतदारसंघामधील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जात आहे. दोन्ही पक्षांकडून त्यामुळे जोरदार शाब्दिक हल्ले प्रतीहल्ले एकमेकांवर सध्या सुरू आहेत. अशातच अनेक आरोप या मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या अमोल कोल्हेंवर करण्यात आले आहेत.
आढळराव पाटील हे पुण्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले, तीन लाखाहून अधिक मताधिक्याने शिरूर मतदार संघामधून माझा विजय होईल. मला भोसरी, हडपसर या ठिकाणाहून 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल एक लाखाचं लीड मिळालं होतं. त्याचप्रमाणे या भागातून यंदा देखील मला मोठं लीड मिळेल, याची मला खात्री आहे.
मोठी ताकद यावेळी माझ्या पाठीशी उभी आहे, कारण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे सध्या एकत्रित असून. त्यामुळे निश्चितपणे साडेतीन लाख मताधिक्य आम्हाला मिळेल असा विश्वास आढळराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला. आढळराव पाटील यांच्यावर त्यांनी आपल्या मतदारसंघात काम केली नसल्याची टीका वारंवार केली जात आहे. यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, 2019 च्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून निवडून आले अमोल कोल्हे, आणि कामं मी कशी काय करायची?
आढळराव पुढे म्हणाले की, आता अमोल कोल्हे यांच्या प्रचार अहवालामध्ये जी कामे छापून आली आहेत ती मी केलेली कामे आहेत. मी केलेली कामं जशीच्या तशी उचलून त्यांनी अहवालामध्ये टाकली आहेत. पुडे त्यांनी असाही आरोप केला की, त्यांनी जी कामे 2019 च्या जाहीरनाम्यात करणार असं वचन दिलं होतं, त्यातलं एकही काम त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेलं नाही.
विधानसभेबाबतच्या धमक्या आमदारांना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “आमदारांना धमक्या देण्याचं काहीच कारण नाही कारण जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे विरोधक फक्त अफवा सोडून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”