पुणे प्रतिनिधी
दि. १५ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर, पुण्यातील पत्रकार परिषदेत मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे विधान करीत अप्रत्यक्षपणे टीका केली होती. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या विधानावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी केलेल्या वक्तव्यामुळे सासरी सुनांना होणाऱ्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे. या वक्तव्याची भीती वाटायला लागली आहे. आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने, सुनांना सासरी होणार्या त्रासामध्ये भर पडणार आहे. त्यांचं हे विधान सुनांना होणाऱ्या त्रासात भर घालणारं आहे!
शरद पवार जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य करत होते तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले लोक हसत असल्याचं पाहायला मिळाले. खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या बाजूला बसले होते आणि अमोल कोल्हे एक कलाकार आहेत हे लक्षात ठेवायला हवे.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका मालिकेच्या माध्यमातून केलेल्या अमोल कोल्हे यांनी साहेबांच्या विधानावर राक्षसी हस्य करत साथ देणे ही निषेधार्ह आहे. त्यामुळे याप्रसंगी साहेबांच्या बाजूला बसलेल्या लोकांचा देखील निषेध करत असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.
चाकणकर म्हणाल्या, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यातल्या सुनांना आता प्रश्न पडत आहे की आमचं घर कोणतं आहे? तसेच ही मुलाखत बघितली नाही असं आपल्या संसदरत्न खासदार म्हणत असून हा निव्वळ ढोंगीपणा आहे. तुम्ही लग्नानंतर सासरी गेलाच नसल्यामुळे सासुरवाशिणीचे दुःख तुम्हाला कसे कळेल, अशी टीका नाव घेता चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली.