कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२४
शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न घेऊन मोठी मजल मारली आहे. एकेकाळी सहा आमदार असलेल्या जिल्ह्यात आता दोन्ही खासदार दिले आहेत. सतत झालेल्या सत्ताबदलानंतर आणि शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन शिवसेनेला कायम ॲक्टीव्ह मोडवर ठेवले आहे. भाजपच्या वरिष्ठ आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा या लोकसभा निवडणुकीत दबाव असताना शिंदे यांनी दोन्ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केला अन् त्यात यशस्वी झाले.
महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडली. ज्या ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना वारंवार भाजपचे मिंधे असे हिणवले, तेच शिंदे आता कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र आहे. मानपानात कोणीही दुखावू नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्री काळजी घेताना दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकलेला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यापासून ते धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत त्यांना घेऊन येण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, कोणत्याही परिस्थितीत संजय मंडलिक आणि माने या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत. दोन दिवसांपासून त्यांनी मध्यरात्री केलेली धावपळदेखील लक्षणीय आहे.
शनिवारी दुपारपासून रविवारी पहाटे साडेपाचपर्यंत जिल्ह्यात गाठीभेटी घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारच्या दौऱ्यातही सेम पॅटर्न वापरला. माजी आमदार महादेवराव महाड़िक यांच्या पुलाची शिरोली येथील बंगल्यात त्यांनी अडीच तास ठिय्या मारून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी फिल्डिंग लावली.
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या नागाळा पार्कमधील निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते थेट पुलाची शिरोली येथील महाडिक यांच्या निवासस्थानी गेले. शिंदे यांच्या स्वतंत्र बैठका सुरू असताना त्यांची धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह नगरसेवकांसोबत एक बैठक झाली. यानंतर शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या भेटी घेऊन विचार विनिमय केला.
त्यांनी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मध्यरात्री भेट घेऊन सूत्रे हलवण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी केला आहे. अगदी कालच्या भाषणात देखील त्यांनी ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असं म्हणत विरोधकांनाच आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धडपडीमुळे साहजिकच दोन्ही उमेदवारांमध्ये नक्कीच शंभर हत्तींचे बळ आले असेल. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा उत्साहही द्विगुणित झालेला असणार आहे. त्यांच्या या धडपडीतून मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे केल्याचे स्पष्ट झाले आहे.







