कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२४
लोकसभेची कोल्हापूर निवडणूक हळूहळू रंगात येऊ लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध जोडण्यांचे प्रयोग केले जात आहेत. अनेक नाराज कार्यकर्त्यांना एकमेकांकडे ओढण्याचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रयत्न सुरू आहे. महायुतीकडून आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठा मास्टर प्लॅन आखला गेला असून तटबंदी भक्कम करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना शहरातील 105 माजी नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे.
महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासोबत, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या १०५ माजी नगरसेवकांची बैठक झाली. प्रचारात उतरण्याचा निर्धार यावेळी या नगरसेवकांनी केला आहे. त्यांच्यामुळे महायुतीला अधिक बळकटी प्राप्त झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. या माजी नगरसेवकांची बैठक कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्हजमध्ये झाली.
“हे १०५ माजी नगरसेवक आणि १२ माजी महापौरांमुळे महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे. निवडणूक आली की, विरोधक भावनिक मुद्देबाहेर काढतात. आता देखील तेच सुरू आहे.” असे खासदार महाडिक म्हणाले.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी म्हणाले “शहराचे घनकचरा, पंचगंगा प्रदूषण आदी जटील प्रश्न कायम आहेत. ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चर्चा झाली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मान्य केले आहे. त्याने कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे,”