अमरावती प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२४
महायुतीकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचारासदेखील सुरुवात केली आहे. एका सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाने त्या अडचणीत सापडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही नवनीत राणा यांनी टीका केली होती. आता त्यांनी थेट मोदींवरच निशाणा साधला आहे.
“ग्रामपंचायतीप्रमाणेच ही निवडणूक आपल्याला लढायची असून, सर्व मतदारांना बारा वाजेपर्यंत आपल्याला बूथवर आणून मतदान करण्यास सांगायचे आहे. मोदींची हवा आहे.., या भ्रमात कोणी राहू नका,” असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे.
गेल्या निवडणुकीत मोदींची हवा असतानादेखील आपण निवडून आल्याचा उल्लेख राणांनी केला. “गेल्या निवडणुकीत मोदींची लाट असतानाही मी अपक्ष म्हणून निवडून येऊन आपला झेंडा गाडला होता,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले. त्यामुळे नवनीत राणा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बावनकुळे म्हणाले होते की, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती रवी राणा हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, नवनीत राणा त्यांना घेऊन येतील. बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेत तेव्हाही नवनीत राणा म्हणाल्या होत्या, “बाहेरच्या व्यक्तींनी नवरा-बायकोमध्ये न बोललेलं बरं,” आता थेट नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांनी विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.