शिरूर प्रतिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. या मतदारसंघात त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शिवाय ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे.
इथे अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रचारादरम्यान ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
अशातच नागरिकशास्त्र विषयावरून आता या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची हे चालणार नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. आढळराव पाटलांच्या या टीकेला कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्वत:च्या कंपन्यांचं भलं न बघता जनतेचं भलं बघायचं हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचं असतं,’ असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला आहे.
खासदाराने निवडून गेल्यावर लोकांमध्ये यायचंच नसतं, त्यानं दिल्लीतच थांबायचं. लोकांच्या अडीअडचणीला सामोरं जायचं नाही हे कोल्हेंचं म्हणणं योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून आढळरावांनी त्यांना नागरिकशास्त्राचा धडा दिला होता. ते म्हणाले, “नागरिकशास्त्रात खासदारांनी कामं न करता, फक्त भाषणं करायची, असं करून चालणार नाही.”
कोल्हेंनी आढळरावांच्या याच वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हे म्हणाले, आढळराव पाटलांनी 2013 ला कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा निर्यातबंदी करावी, यासाठी संसदेत आवाज उठवला. पण शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने संसदेत निलंबनाची पर्वा न करता कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका मी मांडत राहिलो. दोघांमध्ये हाच फरक असल्याचे सांगत नेमकं कुठलं नागरिकशास्त्र पाहायचं? असा सवाल कोल्हे यांनी केला. नागरिकशास्त्रात भलं जनतेचं बघायचं असतं, स्वत:च्या कंपन्यांचे नाही, हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचे आहे, असं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांवर शरसंधान केलं आहे.