नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अद्याप कोणत्याही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. दिल्ली हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच अटकेविरोधातील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता कोर्टात त्यांच्या प्रकृतीवरून याचिका दाखल करण्यात आली आहे. शुगर स्थिर नसल्याचा दावा केजरीवालांतर्फे करण्यात आला आहे.
केजरीवाल यांच्या शुगर लेवलची नियमित तपासणी करण्यात यावी, अशी याचिका दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू कोर्टात करण्यात आली आहे. केजरीवालांचे वकील त्यावर झालेल्या सुनावणीवेळी म्हणाले, त्यांची शुगल लेवल सतत कमी-जास्त होत आहे. ज्या डॉक्टरांकडे त्यांच्या अटकेआधी तपासणी होत होती, आठवड्यातून तीनवेळा त्यांना केजरीवालांशी बोलण्याची परवानगी द्यावी, असे या याचिकेत म्हटले आहे.
ईडीच्या वतीने कोर्टात मोठा दावा, केजरीवालांच्या या मागणीनंतर करण्यात आला आहे. केजरीवालांना घरातून जाणीवपूर्वक बटाटा, पूरी, मिठाई आणि इतर गोड पदार्थ दिले जात आहेत, जेणेकरून त्यांची शुगर लेवल वाढेल, असे ईडीचे वकील जुहैब हुसैन यांनी कोर्टात सांगितले. त्यामागचा हेतू , वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा हा आहे. ईडीने म्हटले आहेकी याबाबत आम्ही जेल प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.
ईडीचा हा दावा फेटाळून लावत केजरीवालांचे वकील विवेक जैन म्हणाले की, असे दावे केवळ प्रसारमाध्यमांसाठी केले जात आहेत. काही खाण्यापूर्वीची केजरीवाल यांची शुगर लेवल 243 होती. जी खूप जास्त आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना जेवण दिले जात आहे.
कोर्टाने केजरीवालांच्या वकिलांना सांगितले, “आम्ही जेलमधून याबाबत अहवाल मागवू”. केजरीवालांचा डाएट चार्टही कोर्टाने मागवला आहे. यावर आता 19 एप्रिलला दुपारी दोन वाजता पुढील सुनावणी होणार आहे. ईडीने कोर्टात यापूर्वीच, दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणात केजरीवाल हेच मुख्य सुत्रधार असल्याचा दावा केला आहे.