मुंबई प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४
१४ एप्रिल रोजी अखिल भारतीय सेनेच्या मंचावरून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. भायखळा येथे महायुतीचा जोरदार प्रचार, नार्वेकर यांच्याकडून केला जात आहे. ‘आपल्या रूपाने एक सदस्य अखिल भारतीय सेनेशी जुळला गेला, या नारवेकरांच्या विधानाने त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांना डॅडी (अरुण गवळी) यांच्याप्रमाणेच प्रेम देईन, असेही ते म्हणाले.
सेनेच्या नेत्या गीता गवळी यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय सेनेच्या मंचावरून त्यांनी भाषण केले. सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना नार्वेकर म्हणाले, “मी विधानसभा अध्यक्ष असल्याने माझे अधिकार मला माहिती आहेत. मी कधीही अखिल भारतीय सेनेची साथ सोडणार नाही. अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना डॅडींप्रमाणेच (गँगस्टर अरुण गवळी) माझ्याकडून प्रेम मिळेल. एक सदस्य अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आलाय असं समजा. भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाहीतर मुंबईची महापौर होईपर्यंत या बहिणीला (गीता गवळी) राहील, असे भाषण नार्वेकरांनी केले.
दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच, १४ एप्रिल रोजी त्यांनी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या या प्रचार सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.