माढा प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज (ता. १९ एप्रिल) माढ्यातून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हाके यांनी महात्मा जोतिराव फुले यांची वेशभूषा करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे हे विशेष. माढ्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे, कारण हाके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
लक्ष्मण हाके हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी, शिवसेना पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रा. लक्ष्मण हाके यांनी प्रवेश केला. त्यावेळी हाके यांनी शहाजी पाटील आणि शिंदे गटाकडून होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर ठाकरेंनी त्यांना राज्याचे प्रवक्ते बनविण्याचा निर्णय घेतला.
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, लक्ष्मण हाके यांनी हातात संविधानाची प्रत आणि महात्मा फुले यांची वेशभूषा करत माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दखल केला आहे.
लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. परंतु हाके यांनी, मराठा आरक्षणाच्या वेळी आयोगाच्या सदस्यांवर येणारा दबाव आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. मूळचे सांगोल्याचे असलेले हाके हे माढा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरल्याने, महाविकास आघाडीत बंडखोरी होणार की उद्धव ठाकरे हे लक्ष्मण हाके यांची समजूत घालणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हंटर कमिशनपुढे, महात्मा फुले हे शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत गेले हेाते. फुले हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून सध्याची लोकशाही मोजक्या गब्बर आणि पैसेवाल्या लोकांच्या हाती गेलेली आहे. बारा ते तेरा लाख ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्ग माढा लोकसभा मतदारसंघात आहे. मात्र, हा या प्रवर्गातील माणूस चांगल्या प्रकारे लढत देऊ शकेल की नाही, अशी परिस्थिती आहे. येथील शेतकरी, भटके विमुक्त, ओबीसींचे प्रश्न डावलले जातात, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
मी स्वतः धनगर समाजातून येतो. माढा लोकसभा मतदारसंघात सहा ते सात लाख लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे. असे असूनही गेल्या ७५ वर्षांत लोकसभेत या समाजाचा एकही खासदार जाऊ शकलेला नाही. गावगाड्यातील अठरा पगड जातीचे प्रतिनिधीत्व या लोकशाहीमध्ये अश्याने कसे होणार आहे. त्यामुळे आजही महात्मा फुलेंच्या विचारांची गरज आहे. अठरा पगड जातीचे प्रश्न, माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि निंबाळकरांना माहिती आहेत का? धनगर समाज आरक्षण आणि ओबीसींना पंचायत राजमधून डावलणे याबाबत माढ्याचे विद्यमान खासदार एकदाही बोलले नाहीत.
माझी लढाई ही सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेतील सर्वांत मोठे डिफॉल्टर मोहिते पाटील यांच्याशी आहे. आम्ही तर निंबाळकर यांचं डिपॉझिट जप्त करू. धनगर समाजाला एक तिकिट देण्याची दानत शरद पवार यांनी दाखवली नाही. त्याचे परिणाम इतर मतदारसंघात त्यांना भोगायला लागतील. सात लाख लोकसंख्येतून, महादेव जानकर हे महायुतीसोबत गेल्यानंतर, त्यांनाधनगर समाजातून एक उमेदवार भेटू शकत नाही का? तुम्ही आम्हाला, आम्ही कारखानदार नाही म्हणून टाळता का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी पवारांना केला.