बारामती प्रतिनिधी:
दि. २० एप्रिल २०२४
बारामती लोकसभेतील महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नारळ फोडून प्रचाराला शुक्रवारी प्रारंभ केला.
कण्हेरी येथील मारुती मंदिरात शनिवारी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. बारामतीकरांना यावेळी त्यांनी भावनिक साद घातली. त्या म्हणाल्या, “बारामती लोकसभा मतदारसंघाची ही सून आपल्या जनतेचे ऋण फेडणार!” .
नक्कीच तुमच्या वहिनीला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. मी आज एका मोठ्या पर्वाची सुरुवात करत आहे. आपला विजय हा निश्चित आहे, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. “काटेवाडी-कण्हेरी गावापासूनच माझ्या समाजकारणाची सुरुवात झाली आहे. तुम्ही मला दिलेल्या विश्वासच्या आधारावर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न मी करेन. नेहमीच माझ्या पाठीशी दादा खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी कधीही माझ्या कामात ढवळाढवळ केली नाही. ते माझ्या पाठीशी इथून पुढे देखील राहणार आहेत,” असे त्या म्हणाल्या.
माजी मंत्री विजय शिवतारे आपली भूमिका बारामतीकरांसमोर मांडताना म्हणाले,”बारामती पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न पन्नास वर्षांपासून कायम आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी याबाबत मी बोललो. त्यांनी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सगळे वैयक्तिक वाद मतभेद सोडून मी आता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक भावनात्मक बाजूने लढणे योग्य नाही. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. मी एखाद्या गोष्टीचा स्थानिक पातळीवर हट्ट धरून जर काम केले तर संपूर्ण राज्यातील महायुतीला तडा जाईल, असे विजय शिवतारे म्हणाले.
“येथे झालेल्या सभेत काल माझ्यावर आरोप करण्यात आले. माझ्या अंगाला आरोप केल्याने भोके पडत नाहीत. बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली असे काल सांगितले गेले. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम हे सगळेजण ही कर्जमाफी करताना यामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आम्ही सुद्धा आणली,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.