बारामती प्रतिनिधी :
दि. २० एप्रिल २०२४
देशाचा कारभार करेल असा दुसरा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय समोर नाही. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना होऊच शकत नाही. दहा वर्षे विरोध करण्यात गेली. पुढील पाच वर्षांतसुद्धा विरोध केला तर आपली कामे होणार नाहीत. त्यासाठी संसदेत महायुतीच्या विचाराचा खासदार पाठवणे गरजेचे आहे. कुणी रडतील, डोळ्यांत पाणी आणतील, पण त्यांच्या ओघात भावनिक होऊ नका, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ, कन्हेरी (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. 20), येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “काल येथे झालेल्या सभेत माझ्यावर आरोप करण्यात आले. माझ्या अंगाला आरोप केल्याने भोके पडत नाहीत. असे सांगितले गेले की, बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम हे सगळेजण यामध्ये ही कर्जमाफी करताना होते. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आम्हीसुद्धा आणली.”
माझ्याबद्दल काही व्यक्ती पवारसाहेबांना 1991 मध्ये म्हणाल्या होत्या की, आपल्या पुढील पिढीने राजकारणात आले पाहिजे. फक्त अजितला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे असं त्यावेळी साहेब म्हणाले होते. बाकीच्यांना धंदापाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मात्र, आता सगळ्यांनीच धंदापाणी सोडले आहे आणि प्रचाराला लागले आहेत. खासदारकीला इकडे मतदान करा विधानसभेला आम्ही फिरकणार नाही, असेही ते म्हणत आहेत. मात्र, खासदारकीलाही आपल्याला इकडेच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारचा निधी विकासकामे करण्यासाठी आवश्यक असतो. आम्ही नरेंद्र मोदी यांना, आपल्या विचाराचा खासदार असेल तर सांगू शकतो की आम्हालाही विकासकामांसाठी निधी द्या, असे अजित पवार म्हणाले.
शेवटच्या सभेत काहीजण रडतील, अगदी डोळ्यात पाणी देखील आणतील, मात्र आपण कोणत्याही भावनिक अवाहनाला बळी न पडता घड्याळाला मतदान करा, अशा शब्दांत, ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. या वेळी विजय शिवतारे, मंगलदास बांदल, अॅड. सुधीर पाटसकर, वासुदेव काळे, नीलेश देवकर, सुरेंद्र जेवरे, यशवंत वाघमारे, माळेगावचे अध्यक्ष केशव जगताप, सोमेश्वरचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे प्रशांत काटे, प्रदीप गारटकर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, जय पवार, प्रवीण माने आदी महायुतीतील नेते उपस्थित होते.