पुणे प्रतिनिधी :
दि. २० एप्रिल २०२४
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘एफसीआरए’ (विदेशी योगदान नियमन कायदा) खात्यात, अमेरिकेतील सुनील आणि साधना शेणॉय दाम्पत्याने एक लाख १५ हजार डॉलर म्हणजेच ९५ लाख २५ हजार रुपयांची देणगी नुकतीच जमा केली.
त्यांनी ६२०० डॉलर गेल्या वर्षी पाठवले होते. एक फेसबुक पोस्ट वाचनात आल्याने या दाम्पत्याने चौकशी करत माहिती घेतली आणि समितीत येऊन देणगी द्यायला सुरुवात केली. शेणॉय कुटुंबीय, समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांचे फेसबुक फ्रेंड आहेत.
त्यांना समितीच्या कार्याविषयीची माहिती डॉ. फडके यांच्या फेसबुक पोस्टवरून मिळाली. त्यांनी प्रथम ६२०० डॉलर त्या पोस्टला प्रतिसाद म्हणून पाठवले होते. शेणॉय कुटुंबीयांनी पुण्यातील मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकामाला गेल्या जानेवारीमध्ये भेट दिली आणि याचवेळी त्यांना समिती कार्याची विस्तृत माहिती मिळाली. समितीच्या सेवाभावी कामाने ते प्रभावित झाले आणि त्यानंतर आणखी एक लाख डॉलर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मात्र प्रत्यक्षात १ लाख १५ हजार डॉलर्स त्यांनी नुकतेच पाठवले.
विश्वस्त तुकाराम गायकवाड ऋणनिर्देश करताना म्हणाले,”समितीला एवढी मोठी मदत, सोशल मीडियाच्या माध्यमातून (अंदाजे १ कोटी रु) मिळाली, याचे समाधान आहे. समाजाचा विश्वास दृढ होतो आणि सढळ हाताने देणगी मिळते, जेव्हा आपले काम प्रामाणिक, पारदर्शी आणि समाजाभिमुख असते! साधना व सुनील शेणॉय आणि डॉ. मकरंद फडके यांचा समिती परिवार ऋणी आहे.”