पुणे प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. ताथवडे येथेही त्यांनी या दौऱ्यात भेट दिली. माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी सुनेत्रा पवार येणार असल्यानं आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. नानासाहेब नवले, सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच म्हणाले, “यू आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉज!”
माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, हे ओळखून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून सुनेत्रा पवार यांनी कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना परके ठरवणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर टीका होताच पवारांना कधी नव्हे तो खुलासा करावा लागला होता “आपण ‘तसे’ बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला गेला,” असे सांगून स्वतःच्या कृत्याचे खापर त्यांनी माध्यमांवर फोडले होते.
एवढेच नव्हे तर, शरद पवारांनी नानासाहेब नवलेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आता त्याच नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांना, ‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ असे प्रशस्तीपत्रक दिले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, खूप आग्रह करून, “दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत”, असे म्हणत जेवण करायला लावले.
यापूर्वी, नानासाहेब नवलेंची पुण्याच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांनी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा दिला होता. आता शाब्बास म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांना सर्वात सरस सून असल्याचे दिलेले प्रशस्तीपत्र महत्वाची घटना मानली जात आहे.
दरम्यान, नानासाहेब नवले यांच्या नातसुनेने म्हणजे जान्हवी सुमेश नवले यांनी नुकतेच युपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवारांनी जान्हवी यांचे कौतुक केले व नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.