मावळ प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
सलग तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे रिंगणात आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (ता. २२) बारणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडील प्रचार सोडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी खास उपस्थिती लावली. बारणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विरोधकांवर तोफ डागली.
अर्ज भरण्यास निघण्यापूर्वी सकाळी थेरगाव येथील निवासस्थानातून बारणेंनी उद्धव ठाकरेंच्या राजवटीत विकासासाठी पावले उचलली गेली नसल्याचा आरोप केला. तसेच प्रचाराकरिता विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्याचेही त्यांनी सांगितले. विजयरथ असे नाव दिलेल्या वाहनातून नंतर त्यांची रॅली निघाली.श्रीरंग बारणे यांची ही रॅली, आकुर्डी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेली.
२०१४, २०१९ आणि आता २०२४, असा सलग तिसऱ्यांदा मावळमधून महायुतीचे उमेदवार म्हणून बारणेंनी अर्ज दाखल केला आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके, विधान परिषद सदस्या उमा खापरे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
बारणेंचे मुख्य प्रतिस्पर्धी आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील हे आहेत. ते आपली उमेदवारी उद्या दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उपनेते सचिन अहीर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. वाघेरे हेसुद्धा रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.