मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुढाकार घेणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि परराष्ट्र धोरणाला प्राधान्य देणे या मुद्द्यांचा समावेश राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात केला आहे.
आपले काका शरद पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच आव्हान देत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष काका-पुतण्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. आपल्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
माजी कृषी मंत्री शरद पवार यशवंतराव चव्हाण यांना आपले गुरू मानतात. आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही मोलाची भूमिका बजावू असे आपल्या जाहिरनाम्यात सांगितले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केला जात आहे. आता यासाठी राष्ट्रावादीने प्रयत्न करणार असल्याचे आपल्या जाहिरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात महत्त्व दिले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी पक्षाची भूमिका आहे असे जाहिरनाम्यात म्हटले आहे. हा जाहीरनामा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसिद्ध केला.