शिरूर प्रतिनिधी :
दि. २३ एप्रिल २०२४
महाविकास आघाडी आणि महायुतीने शिरुर लोकसभेची यावेळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने तेथील प्रचार पहिल्याच टप्यात शिगेला पोहचला आहे. त्यांचे आजी,माजी खासदार असलेले दोन्ही उमेदवार दररोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. असा आरोपांचा धडाका उडवलेला प्रचार सोमवारी (22 एप्रिल ),मात्र एका क्षणी मोठा भावनिक झाला.
त्यांचाच तालुका असलेल्या आंबेगावच्या गावभेट दौऱ्यावर, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील होते. त्यावेळी लौकी गावात ते आले असताना, सुधीर पंढरीनाथ थोरात या शहीद जवानाच्या पाच वर्षाच्या मुलाने त्यांना दिलेल्या अभिनव शुभेच्छा पाहून उमेदवारच नव्हे तर उपस्थितही गहिवरले. या बालकाने शुभेच्छा पत्रासोबत तो आजोबा म्हणणार्या आढळरावांना चॉकलेट सुद्धा दिले.आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) निवडणूक लढवित आहेत.
या बालकाचे नाव यश सुधीर थोरात असे असून तो `केजी`त आहे. त्याचे लष्करात असलेले सुधीर पंढरीनाथ थोरात हे त्याचे वडील गेल्यावर्षी शहीद झाले.लौकी या गावी आढळरावांनी, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या यशला शिक्षणासाठी दत्तक घेतल्याचे जाहीर केले.त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आढळरावांनी घेतली. आपल्या लांडेवाडी, मंचर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्याला प्रवेश दिला. त्यामुळे तेव्हापासून यश त्यांना आजोबा म्हणू लागला.
आज थोरातांच्या लौकीत आढळरावांचा शिरूर लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त गावभेट दौरा होता. हे यशला समजताच त्याने आपली आई तथा वीरपत्नी अश्विनी थोरात यांच्याकडे आपल्या या आजोबांना भेटण्याचा हट्ट धरला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या हाताने आढळरावांसाठी शुभेच्छापत्र तयार केले. देशासाठी त्याच्या पप्पांनी वीरमरण पत्करल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून सोबत राहिल्याबद्दल यशने या ग्रिटींगमध्ये स्वतःच्या अक्षरात आपल्या या आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जनतेची अशीच सेवा करण्याची संधी तुम्हाला पु्न्हा मिळो,अशा शुभेच्छा त्याने त्यात पुढे दिल्या. हे पत्र चॉकलेटसह त्याने आढळरावांना दिले त्याक्षणी ते गहिवरले. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले.
यशची आजी आणि वीर माता कौसल्या पंढरीनाथ थोरात सुद्धा या ह्रद्य भेटीच्या वेळी त्याच्या सोबत होती. आपला मुलगा सुधीर हुतात्मा झाल्यानंतर आढळराव हे भावासारखे आमच्या कटुंबाच्या मागे उभे राहिले. ते कधी विसरणार नाही, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहातात,अशी प्रतिक्रिया या भावनिक क्षणी आढळरावांनी दिली.