कोरोना महामारीत सापडलेल्या सर्कस कलाकारांना दिला हौसिंग सोसायटीने मदतीचा हात
पुणे शहरातील हडपसर भागातील ‘सन सफायर’ सोसायटीचे सर्वस्तरातून होतेय कौतूक.
पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. १७ मे २०२१
पुणे शहरातील मुंढवा परिसरातील रेम्बो सर्कस कलाकार, सर्कसचे कर्मचारी व सर्कसमधील प्राणी सध्या कोरोना महामारीत लॅाकडाऊनमूळे आर्थिक संकटात सापडल्याची टीव्हीवरील बातमी पाहून पुणे शहरातील हडपसर भागातील सन सफायर या सोसायटीने सर्कसला अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिला आहे. ‘सन सफायर’ सोसायटीच्या या मदतीचे शहरातील सर्व स्तरातून विशेष कौतूक होत आहे. या सोसायटीतील नागरिकांनी आपली संवेदनशीलता दाखवून एक प्रकारे माणूकीसचे दर्शन घडविल्याचे पहावयास मिळाले आहे.
‘सन सफायर’ या सोसायटीमधील पुणे शहर निवासी नायब तहसीलदार संजय खडतरे, अरुण कदम व किशोर साहू या सदस्यांनी मुंढवा परिसरात गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोना व लॅाकडाऊन मुळे बंद असलेल्या रेम्बो सर्कस ला भेट दिली. त्यावेळी तेथील कलाकारांच्या त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. रेम्बो सर्कस मध्ये एकूण 47 कलाकार व कर्मचारी आहेत. तसेच त्यांच्यासोबत अठरा प्राणीसुद्धा असून या सर्व कलाकार व प्राण्यांचे सध्या लॅाकडाऊन मुळे आर्थिक व अन्न पाण्याची तारांबळ उडालेली हे या सदस्यांनी पाहिले. सध्याच्या कोरोना महामारीत या सर्व कलाकार कोणतेही अर्थाजन व काम नसल्याने हाताश होऊन बसलेले आहेत. सध्या या लोकांपुढे सगळ्यात मोठा गहन प्रश्न अन्न पाण्याचा आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या सर्कसमधील 18 प्राण्यांना जगवण्याचा फार मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
सोसायटीमधील सदस्यांनी सर्कला भेट दिल्यानंतर अक्षरक्षः हे कलाकार व मॅनेजर डोळ्यात पाणी आणून त्यांची व्यथा सांगत होते. सर्कलवाल्यांची व्यथा पाहून या सदस्यांनी सन सफायर सोसायटीतील सर्व सदस्यांना या तिघांनी मदत करणे बाबत व्हाट्सअप ग्रुप मधून आवाहन केले. त्या आवाहनास ग्रुपमधील व सोसायटी मधील सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सढळ हाताने मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यानुसार दिनांक ५ मे २०२१ रोजी सोसायटीच्या परिसरात सर्कस मधील मॅनेजर व कलाकार यांना 600 किलो तांदूळ, 30 किलो तूर डाळ, तीस किलो खाद्य तेल, 100 किलो कांदे, शंभर किलो बटाटे आणि सर्व प्रकारचे मसाले प्रत्येकी दोन दोन किलो असे मिळून अंदाजे 30 हजार रुपये पर्यंत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्याचे वाटप सोसायटीमधील चेअरमन व कमिटी सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सर्कस कलाकांराना अन्नधान्य वाटप करण्यासाठी पुणे शहर नायब तहसीलदार संजय खडतरे, ज्येष्ठ नागरिक अरुण कदम व भारतीय रेल्वे अधिकारी किशोर साहू यांनी विशेष श्रम घेऊन सर्कस कलाकार व कर्मचार्यांना मदत करण्याची मोलाची कामगिरी केल्याबद्दल सर्व सोसायटी मधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याविषयी बोलताना नायब तहसीलदार संजय खडतरे म्हणाले, “आपण सर्वजण अडचणीच्या काळातून जात आहोत. लॅाकडाऊन व कोरोना महामारीमूळे अनेकांचे अर्थचक्र थांबले असून अनेक घरे उघड्यावर पडली आहेत. तेंव्हा, आम्ही ज्या पद्धतीने सोसायटीतील सर्व नागरिकांनी पुढे येत सर्कस कलाकार, कर्मचारी व प्राणी यांना मदत केली त्याच प्रकारची मदत गरजूंना इतर सोसायट्यांनी करावी.”
या प्रसंगी सोसायटी चेअरमन अश्विन भिसे, सोसायटी कमिटी सदस्य पुणेकर, किशोर साहू, अॅड.अभिजीत डोईफोडे, अरुण कुमार चौधरी व अरुण शिरसागर इत्यादी लोक हजर होते.