अकोला प्रतिनिधी :
दि. २४ एप्रिल २०२४
मतदानाची तारीख जशी जवळ येते आहे तशी लोकसभा निवडणुकीची रंगत वाढून प्रचाराचा वेगही वाढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवार, नेत्यांची एकमेकांवर टीकेची झोड सुरू आहे. बाईक रॅली, पदयात्रा, जाहीर सभा यांद्वारे मतदारांपर्यत पोहोचण्यावर आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळते आहे.
राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार थांबणार आहे. अधिकाधिक प्रचार करण्यासाठी, दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक नेत्यांच्याही सभा होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनीही जोर लावला आहे. नेत्यांच्या सभांच्या तोफा विविध मतदारसंघांत धडाडत आहेत.
मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोल्यात मुक्कामाला होते. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी, बुधवारी सकाळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. खालच्या स्तरावर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर टीका करतात, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडलंय, अशी सडेतोड टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे विभाग कडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती दिली. सुनेत्रा पवार तसेच आमदार रोहित पवारांना क्लीन चिट देण्यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हा भाग चौकशीचा आहे. चौकशीमध्ये जे निष्पन्न झाले असेल ते लवकरच समोर येईल.
निवडणुका तोंडावर आल्या तरी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपावरून महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. राज्यातल्या सर्व जागांचा तिढा लवकरच सुटेल, यात कुठेही गुंता नाही. आमदार विप्लव बाजोरिया, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्यातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.