पुणे प्रतिनिधी :
दि. २५ एप्रिल २०२४
आता अधिक वेगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीत आपल्यालाच मतदान व्हावे, यासाठी जोरदार तयारी करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने, या निवडणुकीच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. विविध पथकांची निर्मितीदेखील यासाठी करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून २७ लाख रुपयांची रोख रक्कम निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने संयुक्त कारवाईत पकडली. वाकड-हिंजवडी पुलाखाली जी नाकाबंदी करण्यात आली होती, त्या नाकाबंदीचा भाग म्हणून ही रक्कम जप्त करण्यात आली. मंगळवारी रात्री ही कारवाई झाली. पुणे शहर, बारामती, मुळशी आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील निवडणूक होत आहे. बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे तर उर्वरित तीनही मतदारसंघात 13 मे ला मतदान होईल.
18 एप्रिलपासून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील राजकीय हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत. जोरदार प्रचार उमेदवारांकडून सुरू आहे. त्यासोबतच जोरदार तयारी प्रशासनानेदेखील केली आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शहरातील विविध भागात नाकाबंदी केली जात आहे. संशयित वाहनांची तपासणी रात्रीबरोबरच दिवसाही नाकाबंदी करत केली जात आहे.
मुंबईकडून वाकडच्या दिशेने मंगळवारी रात्री एक चारचाकी गाडी येत होती. पथकाने या गाडीची तपासणी केली असता गाडीत रोकड मिळून आली. गाडीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याची बतावणी करत होती. मात्र, त्या व्यक्तीला तिच्याकडे असलेल्या रोख रकमेची कोणतीही समाधानकारक माहिती देता न आल्यामुळे ही रोख रक्कम आणि गाडी जप्त करण्यात आली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी तीन लाख 80 हजार रुपयांची रक्कम पुणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात जप्त करण्यात आली होती. निवडणुकीच्या कामासाठी कसबा मतदारसंघात नेमलेल्या पथकाने ही कारवाई केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शनिवारवाडा येथील गेटसमोर दुपारच्या वेळेत एका व्यक्तीकडून पथकाने, फरासखाना पोलिस स्टेशन अंतर्गत ही रक्कम जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. अश्या परिस्थितीत बाळगलेल्या रकमेची माहिती संबंधित पथक तसेच पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी लागते. सदर घटनेत पथकाला कारवाईत जी रोख रक्कम सापडली त्याबाबत संबंधित व्यक्तीला योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करून जिल्हा प्रशासनाने जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केली आहे.