शिरूर प्रतिनिधी :
दि. २६ एप्रिल २०२४
खरेतर छगन भुजबळ यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार होती, असा दावा डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता. या दाव्यासोबतच उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) डमी उमेदवार आहेत. मी त्यांच्यावर फार काही बोलणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. आता अमोल कोल्ह्यांच्या टोल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आपला उमेदवारी अर्ज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दाखल केला. त्यानंतर अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देताना ‘मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे.’, असं म्हणत आढळरावांनी त्यांच्यावर पलटवार केला. आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते, अश्याप्रकारे कोल्हेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. अशी विधाने करण्यात कोल्हे अन् संजय राऊतांमध्ये साम्य आहे, असं म्हणत आढळरावांनी त्यावेळी कोल्हेंची टर उडवली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आढळरावांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते. हाच धागा पकडून अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोला लगावला होता. ‘विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज आज भरला गेला. पण मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज भरायला आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही.’, असे कोल्हे म्हणाले होते.
कोल्हेंच्या, छगन भुजबळ यांना शिरुरमधून उमेदवारी देण्यात येणार होती, या दाव्यावर छगन भुजबळ यांनी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिरुरमधून लढणार का, अशी विचारणा केली होती. नाशिकमधून त्यांची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता. त्याबदल्यात त्यांना नाशिक हवे होते, असे देखील भुजबळ म्हणाले होते.