इंदापूर प्रतिनिधी :
दि. ०४ मे २०२४
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे आणि माझं इंदापूरला शेतीसाठी पाणी द्यायच ठरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मदतीचा शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही, शेतीसाठीचं पाणी, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, हवेली या भागाला देणार आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमगाव केतकी येथील सभेत सांगितले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेत बोलत होते. या सभेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रवीण माने, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील, सरपंच प्रवीण डोंगरे आणि त्याबरोबरच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, काही लोक येऊन डोळ्यातून पाणी काढून तुम्हाला भावनिक करतील. पण लक्षात ठेवा की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तुमच्या शेतीला पाणी येणार नाही. त्यासाठी अंगात पाणी असणाराच माणूस लागतो आणि आमच्या अंगात पाणी आहे, त्यामुळे उर्वरीत तालुक्यात सर्वत्र पाणी आणण्याचे काम आम्ही करणार आहेात.
वास्तविक १९७८ मध्येच इंदापूर तालुक्यातील शेतीचा बारमाही पाणीप्रश्न सोडविण्याचे ठरले होते. त्यानंतर शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी इंदापूरचा पाणी प्रश्न सुटणार या आशेने लोकांनी हत्तीवरून साखर वाटली आणि मिरवणूक काढली होती. मात्र, पाण्याचा प्रश्न गेली 45 वर्षे झाली तरीही कायम आहे. पण, आम्ही आता इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्याचे निश्चित केले आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, खडकवासला धरण साखळीतील खडकसवाला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांचे पाणी प्यायला अधिक पण शेतीला कमी मिळतेय. पण मुळशीचं पाणी जर पुण्याला प्यायला दिलं आणि शिल्लक पाणी शेतीला दिलं तर हा भाग समृद्ध होण्यास मदत होईल.
ते पुढे म्हणाले, बारामतीचा खासदार मोदींच्या विचाराचा असेल तर पाण्याचा प्रश्न सहजगत्या सुटेल. येथील बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासठी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत जाऊन प्रयत्न करण्यात येतील. तसेच भरणे यांनी, इंदापूरच्या शेतीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अजित दादांच्या पाठीमागे सर्वांनी ताकद उभी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.