मुंबई प्रतीनिधी :
दि. ०९ मे २०२४
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘एका’ विधानाने राजकीय वर्तुळात सध्या चर्चांचे पेव फुटले आहे. भाजपकडून मात्र पवारांच्या या विधानावर टीका करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत बरेच प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसबरोबर येतील शिवाय त्यातील काही पक्ष त्यात विलीनही होऊ शकतात, असं खळबळजनक विधान पवार यांनी नुकतंच केलं. पवारांच्या याच विधानावर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे.
यावेळी मुनगंटीवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला दिला. ते म्हणाले की या आत्मचरित्रावरून लक्षात येतं की, पवार यांचं राजकारण हे कायम तडजोडीचं आणि सत्तेच्या स्वार्थाचं राहिलेलं आहे. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून धरत त्यांनी सोनिया गांधींवर टीका केली आणि वेगळा पक्ष काढला पण नंतर काही काळाने ते कॉंग्रेस बरोबर गेले. सोनिया गांधी या शरद पवारांवर विश्वास ठेवत नव्हत्या असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
शिवाय पवारांना असे म्हणावे लागल्याचे कारण देताना मुनगंटीवार म्हणाले, त्यांना राष्ट्रवादीच्या भवितव्याची कल्पना आलेली आहे. आज राष्ट्रवादीचा खंबीर आधार असलेले अजित पवार त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत. बारामतीच्या निवडणुकीत खालच्या स्तरावर जाऊन प्रचार करत त्यांनी अजितदादांना खूप दुखावलं आहे. त्यामुळे आता अजित पवार काही परत त्यांच्याकडे जाणार नाहीत. आताची शिवसेना ही शिवसैनिकांची नसून उद्धव ठाकरेंची आहे. तशीच कहाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (शरद पवार) आहे. तो सुद्धा शरद पवारांच्या नावाने आहे. हे पक्ष इतिहासाला तडा देत आता कार्यकर्त्यांचे न राहाता नावांचे झाले आहेत.
राजकारणात जे पक्ष समविचारी असतात त्यांचंसुद्धा विलीनीकरण झाल्याचे दाखले नाहीत. असे असताना विलीनीकारणाचा जो मुद्दा पवारांनी बोललाय तो भवितव्याला अधोरेखित करतो. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “या निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपतील!” याच वक्तव्याचा पवारांच्या विधानाशी संबंध असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला.
पुढे मुनगंटीवार म्हणाले, “आम्हाला २०१४ साली बहुमत नव्हतं तेव्हा पवारांनी न मागता पाठिंबा दिला होता. भाजपसोबत त्यावेळी जाण्याचा निर्णय कोणाचा होता? त्यामुळेच ‘लोक माझे सांगाती’ मधून पवारांचं राजकारण काय आहे ते समजतं. पवारांनी आपल्या भावाचा पराभव केला होता तसेच आज एक भाऊ आपल्या बहिणीचा पराभव करेल.”असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.