हैदराबाद प्रतिनिधी :
दि. ०९ मे २०२४
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार यांनी AIMIM वर जोरदार पलटवार केला आहे. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे AIMIM चे प्रवक्ता वारिस पठाण यांनी नवनीत राणा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निवडणुकीच्या काळात अश्या वक्तव्यांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले.
तेलंगणातील हैदराबादमधील एका सभेत बोलताना राणा म्हणाल्या होत्या की, असदुद्दीन ओवैसी यांच्या छोट्या भावाने (अकबरुद्दीन ओवैसी) म्हटलं होतं की’ “१५ मिनिटांसाठी पोलिस हटवा, मग बघा आम्ही काय करतो.मला त्यांना सांगायचं आहे की त्यांना १५ मिनिटं लागतील, पण आम्हाला १५ सेकंद लागतील. जर १५ मिनिटांसाठी पोलिस हटवले तर तुम्हाला कळणार देखील नाही, आम्ही कुठून आलो आणि कुठे गेलो…फक्त १५ सेकंद लागतील!”
नवनीत राणा या भाजपच्या हैदराबाद मधील उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारसभेदरम्यान बोलत होत्या. यावेळी त्यांनी केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राणा म्हणताहेत, “फक्त १५ सेकंद पोलिस हटवा, तुम्हाला कळणार देखील नाही, आम्ही कुठून आलो आणि कुठे गेलो.” राणा यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवैसी यांना त्यात टॅग केलं आहे.
राणा यांच्या या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वारिस पठाण यांचं म्हणणं आहे की भाजपचे नेते निवडणुकीदरम्यान असे वक्तव्य करत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. आयोगाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी कारण अश्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात माधवी लता आणि AIMIM चे असदुद्दीन ओवैसी यांच्यात थेट लढत होत आहे. असदुद्दीन ओवैसी हे गेल्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ आपल्याकडे राखून आहेत. माधवी लता या तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून या वेळी त्यांच्यासमोर उभ्या आहेत. या दोघांत कोण विजयी होतं हा अतिशय औत्सुक्याचा विषय झालेला आहे.