मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२४
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. अजित पवारांनी ४० हून अधिक आमदारांना बरोबर घेत थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आणि महायुतीमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जो प्रयत्न त्यांनी २०१९ मध्ये केला होता ते बंड शरद पवारांनी मोडून काढलं होतं. शरद पवारांच्या सांगण्यावरुनच आपण ते सगळं केलं होतं असाही खुलासा अजित पवार यांनी केला आहे. तर आता देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवारांना शरद पवार हे व्हिलन ठरवत होते असा दावा केला आहे. तसंच अजित पवारांवर त्यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे.
“२००९ ते २०१२ या वर्षांमधे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. राज्यात त्यावेळी ते मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची त्यावेळी चौकशीही करण्यात आली. मी केलेले आरोप खरे असल्याचंही तपासात समोर आलं. या तपासानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबितही केलं गेलं. त्यातील काहींना शिक्षा झाली तर काही बडतर्फ झाले. तेव्हा त्या विभागाचे प्रमुख अजित पवार हे होते. मात्र त्यांचा थेट संबंध संपूर्ण तपासात आढळून आला नाही. आरोपपत्रात त्यामुळे त्यांचं नाव नव्हतं. २०१२ चं हे प्रकरण आहे. अजित पवार आत्ता आमच्याबरोबर आले आहेत.”
“यावेळच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा जास्त होत आहेत याचं महत्त्वाचं कारण तशी मागणी आहे. लोकांना मोदींना ऐकायचं आहे. त्याचप्रमाणे सभांची संख्या, प्रचाराला चांगला वेळ मिळाल्याने वाढली आहे. मागच्या २०१९ च्या निवडणुकीला एकच शिवसेना होती. आता दोन शिवसेना म्हणजे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, त्यामुळे मतं काही प्रमाणांत विभागली जाणार आहेत” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच “शरद पवारांनी अजित पवारांना कायमच व्हिलन ठरवलं” असंही ते म्हणाले आहेत. हा दावा त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, “भाजपासह शरद पवारांना युती करायची होती. त्यांनी यासंदर्भातला निर्णय तीनवेळा घेतला होता आणि नंतर तो फिरवला. आता मला याबाबत असं वाटतं की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करून त्यांना सगळ्या गोष्टींसाठी व्हिलन करत होते. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जशी मेहनत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने अजित पवारांनीही मेहनत घेतली. अजित पवारांना व्हिलन करून घरात दुसर्या कुणाला तरी हिरो करणं हे शरद पवारांना हवं होतं. कारण त्यांना त्यांचीच सत्ता पक्षावर हवी होती.”