मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२४
“आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती झाली नसती जर उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती! बरेच वेळा काही निर्णय घ्यावे लागतात. तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. मोदींना तिसऱ्यांदा निवडणून आणायचं आहे हे आमचे मतदार जाणून आहेत. मोदींना, भाजपाला खिंडीत गाठायचा त्यांचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“२०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे भाजपासह युती करुन विधानसभेची निवडणूक निवडून आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे फोटो स्टँपसाईज आणि मोदींचे फोटो लाइफसाईज असायचे. सगळ्या निवडणूक प्रचारात ते मोदींचे फोटो लावून निवडून आले. तसंच त्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे सगळे प्रचारसभांमध्ये सांगायचे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. उद्धव ठाकरेही त्यांच्या सभांमधून त्यावेळी हेच सांगायचे. पण निकालाचा दिवस उजाडल्यावर संख्याबळ समोर आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की गणित बसणार नाही. राष्ट्रवादीला निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरेंनी बरोबर घेतलं होतं. ती तयारी भाजपाला थोडं खाली आणण्यासाठी होती. पण संख्याबळ पाहाताच उद्धव ठाकरेंनी बेइमानी केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं.” ही बेईमानीच असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच शरद पवारांशी संधान साधलं होतं. कारण जिथे शरद पवारांचा पक्ष काँग्रेसविरोधात लढत होता तिथे उद्धव ठाकरेंना मदत करायची आणि जिथे भाजपा विरोधात शरद पवार लढत आहेत तिथे उद्धव ठाकरेंनी मदत करायची असं त्यांचं ठरलं होतं. शरद पवारांनी यामागे असलेलं लॉजिक त्यांना समजावलं होतं. उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी सांगितलं होतं की एकट्या भाजपाच्या १३० जागा येऊ शकतात. त्या आल्या तर भाजपा तुम्हाला विचारणार नाही त्यामुळे आपण जर एकमेकांना मदत केली तर भाजपाच्या जागा कमी होतील. आमच्या जागा वाढल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्हीही भाजपावर अंकुश ठेवू. पुण्यात आम्ही हरलो त्यावेळेस तेव्हाची अख्खी शिवसेना राष्ट्रवादीच्या मागे उभी होती. अनेक ठिकाणी असे प्रकार आमच्या लक्षात आले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“हा सगळा प्रकार आम्हाला निवडणूक काळात लक्षात आला. निवडणूक प्रक्रिया फार वेगात होत असल्याने जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्या काळात बंडखोरीही झाली होती. मी भाजपाचे ९० ते ९५ टक्के बंडखोर मागे घेतले. उद्धव ठाकरेंनी फक्त फोन लावले पण बंडखोर एकही परत घेतला नाही. मग ते बोलायचे काय?” असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मोदी लाट का दिसत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणूक देशाची असल्याने आम्ही मोदींच्या नावेच मतं मागणार. एनडीएचं कुणीही निवडून आलं तरीही त्याचं मत हे मोदींनाच मिळणार आहे. यूपीएचं कुणी निवडून आलं तर त्याचं मत हे राहुल गांधींना मिळणार आहे असं आपण समजू कारण त्यांचा नेता अद्याप ठरलेला नाही. मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच ही निवडणूक आहे. शांतपणे निवडणूक चालल्यासारखं वाटण्याचं कारण तेच आहे. २०१४ मध्ये मतदारांना एक आशा होती. त्याने मोदींना मतदान केलं. २०१९ मध्ये मतदारांनी पाच वर्षांमधलं मोदींचं काम पाहून मतदान केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मतदार भाजपाचा मतदार झाला आहे. तुमचा मतदार जो असतो तो शांतपणे मतदान करतो. आमच्या मतदारांच्या मनात मोदींना निवडून द्यायचं हे पक्कं आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये लाट होती तशी आत्ता दिसत नसल्याची चर्चा होते, याचं कारणच आमचे मतदार शांतपणे मोदींना मत देत आहेत, हेच आहे.”