मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२४
गेली सहा वर्षेभाजपबरोबर असलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी केली. यावेळी कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पूर्व विदर्भात ठाकरे गटाला कुथे यांच्या प्रवेशाने मजबुती मिळाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात उड्या मारण्याचे अर्थात पक्ष प्रवेशाचे उधाण आले आहे. याला अनुसरून शुक्रवारी विदर्भ तसेच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे हे मूळ शिवसेनेतच होते. ते शिवसेनेच्या चिन्हावर १९९५ आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. मात्र, त्यानंतर कुथे यांनी २०१८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, कुथे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील नाराजी बोलून दाखवली. बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे आमची पक्षात फसवणूक झाल्याची जाणीव झाली असल्याचे ते म्हणाले. ते एका बैठकीत आम्हाला म्हणाले की, आपल्या पक्षात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागलेली आहे. जे येतात त्या सार्यांना होकार द्या आणि काही जणार्यांना जाऊ द्या. कारण आपण प्रत्येकालाच आनंदी ठेवणं आपल्याला शक्य नाही. आपल्या पक्षात जेव्हा १०० लोक येतील, त्यावेळी पाच जण पक्ष सोडून जरी गेले तरी आपला पक्ष ९५% नफ्यात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते विधान ऐकून लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले. आज मी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले . कुथे यांच्या प्रवेशामुळे ते आगामी विधानसभा निवडणूक ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणार आहेत हे स्पष्ट होते.
दरम्यान, रमेश कुथे यांच्याबरोबरच इतर स्थानिक भाजप नेत्यांनीआणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपच्या डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड आदींनी शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.