नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०७ ऑगस्ट २०२४
भारतीय कुस्तीपटू आणि पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकून देशाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अवघा एक टप्पा लांब असलेल्या विनेश फोगाटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आलं. भारताचं गोल्ड मेडलचं स्वप्न यामुळे भंगलं आहे. ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात विनेश फोगाट ही आज अंतिम सामना खेळणार होती. तिच्या गोल्ड मेडल जिंकण्याची आशा साऱ्या भारतीयांना होती. मात्र, जेव्हा तिचं वजन सामन्यापूर्वी करण्यात आलं, तेव्हा ते ५० किलो ग्रॅमपेक्षा अवघ्या काही ग्रॅमने जास्त निघाले आणि तिला नियमांनुसार अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगाटलाच नाही तर यामुळे तिच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी सरकार आणि कुस्ती फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत. “हे राजकारण आहे. १०० ग्रॅम वजन काय जास्त असतं का, हे षडयंत्र आहे. यामध्ये सरकारचा हात आहे. १०० ग्रॅम वजन किती असतं, केस कापले तरी १०० ग्रॅम वजन कमी झालं असतं. तर मग त्यांना जेव्हा माहिती होतं की तिचं १०० ग्रॅम वजन जास्त आहे, तर तिचे केस कापायला हवे होते. तिच्यासोबत जे लोक होते, जो स्टाफ होता, त्यांनी अजिबात तिची मदत केली नाही. यामध्ये सरकार आणि कुस्ती फेडरेशनचा हात आहे. ती आपल्या लोकांना सोबत घेऊन गेली, पण त्यांना स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. विनेश वारंवार सांगत होती की तिच्यासोबत षडयंत्र रचलं जाईल आणि अखेर आज ते सिद्ध झालं”, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नेमकं काय घडलं?
विनेश फोगाट ही ५० किलो वजन गटात फ्रीस्टाईल कुस्तीचा अंतिम सामना ८ ऑगस्टला रात्री साडेबारा वाजता खेळणार होती. तिचा सामना अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडसोबत होता. सामन्यापूर्वी खेळाडूंचं वजन केलं जातं. विनेशचं वजन मंगळवारी (६ ऑगस्ट) झालेल्या सामन्यावेळी ५० किलोच्या आत होतं. पण, रात्री तिचं वजन दोन किलोने वाढलं. त्यामुळे वजन कमी करण्याचा तिने संपूर्ण रात्र जागून प्रयत्न केला. तिने वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जॉगिंग, सायकलिंग, स्किपिंग करुन केला. पण, तिचे हे सारे प्रयत्न, तिचे कष्ट धुळीस मिळाले. जेव्हा बुधवारी (७ ऑगस्ट) ला तिचं वजन केलं तेव्हा ते अवघ्या १०० ग्रॅमने अधिक असल्याचं दिसून आलं आणि नियमांनुसार तिला अपात्र ठरवण्यात आलं.
आता या प्रकारात फक्त सुवर्ण आणि कांस्य पदक दिलं जाईल. अमेरिकेच्या खेळाडूला सुवर्ण पदक दिलं जाईल, तर रौप्य पदक हे कोणालाही मिळणार नाही.