मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ ऑगस्ट २०२४
मुंबई : स्वाभिमान गमावणे याचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाकडे बघावं, जेमतेम १०० जागा मिळवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अशा शब्दात सडकून टीका केली आहे. दोन चार जागांसाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचंही उपाध्ये म्हणाले.
स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी, २५ वर्ष भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, प्रत्यक्ष अस्तित्वात आणली होती. १२५ पेक्षा जास्त जागांवर भाजप सोबत असताना लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशी खरमरीत टीका केशव उपाध्येंनी केली आहे.
आमचा स्वाभिमान झुलवत नाही, दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून गर्जना करणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचा टोलाही उपाध्येंनी लगावला आहे.
अमित शहा भाजपचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले आणि योग्य तो सन्मान दिला, पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही. त्याच अमित शहांची तुलनाही उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली. ज्या राजकीय हव्यासापोटी आणि सत्तेसाठी भाजपसोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं, असा शेराही केशव उपाध्येंनी मारला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाहीये, ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे तुम्ही सांगत होतात. एकेकाळी महाराष्ट्राच्या निवडणुका ज्यांच्या नेतृत्वात लढवल्या जायच्या, जागावाटप करण्याचे सूत्र जे ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे.