सॅनिटायझर हे सामान्यतः हातावरील किंवा वस्तूवरील संसर्गजन्य जंतू, विषाणूंची तीव्रता, दाहकता कमी करण्यासाठी तसेच जंतू निष्क्रिय करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, जंतुविरहीत करण्यासाठीही वापरले जाते. जे द्रव, जेल आणि फोम या तीन स्वरूपात उपलब्ध आहेत. जे अल्कोहोलसहित आणि अल्कोहोल रहित प्रकारांमध्ये मिळते.
अल्कोहोल सहित प्रकारात सामान्यत: आयसोप्रोपाईल अल्कोहोल, इथेनॉल (इथाईल अल्कोहोल) किंवा एन-प्रोपेनॉलचे मिश्रण असते. त्यात ६० ते ९५% अल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स सर्वात प्रभावी समजले जातात. ९०% प्रमाण असलेले अल्कोहोलबेस्ड सॅनिटायझर अत्यंत ज्वलनशील आहेत, परंतु फ्लू विषाणू, व्हायरस, सर्दी पडसे पसरवणारे विषाणू, कोरोना व्हायरस, एचआयव्ही व्हायरस, बहुतेक सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करतात आणि काही व्हायरसची ग्रोथ थांबवतात.
पुरातन काळात अल्कोहोल General Anesthetic म्हणून वापरले जायचे. सण १६०० च्या आसपास अल्कोहोलचा प्रथमच Antiseptic (स्पिरिट), औषध म्हणून वापर केला गेला. रसायनशास्त्रज्ञ “राझी”, जे सल्फ्यूरिक ऍसिडचे अभ्यासक म्हणून इथेनॉलचे (इथाईल अल्कोहोल) संशोधक आणि इथेनॉलचा वापर “औषध” म्हणून (Ethanol used as a Medicine) करणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात, त्यांनी इथेनॉलचा शोध लावला. पुढे ते बगदाद हॉस्पिटल मध्ये मुख्य चिकित्सक बनले. ज्याला आज रबिंग अल्कोहोल म्हणून ओळखले जाते त्याचा शोध राझी यांनी लावला.
सॅनिटायझर वापरण्याची पद्धत.
अल्कोहोलबेस्ड सॅनिटायझर वापरताना आपले हात तेलकट, मळकट नसावेत, मुख्यतः स्वच्छ दिसणाऱ्या हातावरील असंख्य सूक्ष्म घातक जंतू, विषाणू नष्ट करण्यासाठी हे वापरले जाते. कोरड्या हातावर (ओलाव्यात जंतू टिकून राहतात) सॅनिटायझर जेल, लिक्विड घेऊन हातावरील, तळव्यावरील सर्व पृष्ठभागावर कानाकोपऱ्यातुन १० ते २० सेकंदांपर्यंत फिरवून हात कोरडे होईपर्यंत चोळत राहाणे जास्त फायदेशीर ठरते.
६५% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेले सॅनिटायझर जास्तीत जास्त प्रकारचे जंतू / विषाणू नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
साबण चांगला की सॅनिटायझर ?
अमेरिकेतील CDC या हेल्थ इन्स्टिट्यूट नुसार स्वच्छ वाहत्या पाण्यात चांगल्या प्रतीच्या साबणाने हात धुणे, हे केंव्हाही सॅनिटायझर्स पेक्षा जास्त प्रभावी ठरते. जेंव्हा कामामुळे हात अस्वच्छ, तेलकट किंवा मळलेले असतात, या वेळेस हे सॅनिटायझर्स उपयोगी पडत नाहीत अशा वेळेस आपले हात स्वच्छ करण्यासाठी साबणंच उपयोगी पडतो.
परंतु तज्ञ डॉक्टरांच्या नुसार, हात धुण्यासाठी चांगल्या प्रतीचा साबण आणि वाहते पाणी ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. प्रवासात असताना म्हणजे ज्यावेळेस साबण आणि पाणी उपलब्ध नसते, त्यावेळेस हे सॅनिटायझर्स हात स्वच्छ आणि जंतूविरहित करण्यासाठी पर्यायी म्हणून वापरले जातात जे 99% जंतू नष्ट करण्याचा दावा करतात; पण हे अल्कोहोलबेस्ड सॅनिटायझर जंतूंची संख्या आणि तीव्रता नक्कीच कमी करतात, पण सर्वच प्रकारचे विषाणू, व्हायरस हे सॅनिटायझर्स नष्ट करतात असे म्हणने धाडसाचे ठरेल.
हँड सॅनिटायझर सारखे सारखे वापरले गेले तर त्याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात.
नैसर्गिक तेलकटपणा आणि आवरणामुळे आपली त्वचा चकचकीत तैलदार आणि चांगली राहते, पण हँड सॅनिटायझर्समध्ये आयसोप्रोपिल, इथेनॉल आणि एन-प्रोपेनॉलचा हे घटक असतात. सॅनिटायझरच्या सारख्या वापरामुळे ती शुष्क आणि कोरडी पडते. त्यामुळे खाज सुटून त्वचा विकार होण्याचा संभव असतो.