डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०८ ऑगस्ट २०२४
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट विनेशने खळबळजनक निर्णय घेतला. विनेशने गुरुवारी पहाटे ५ वाजून १७ मिनिटांनी कुस्तीला अलविदा करण्याची हार्ट ब्रेकिंग न्यूज जाहीर केली. विनेशने हा मोठा निर्णय, पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित विनेशने हा भारतीय चाहत्यांच्या हृदयाला चरे पाडणारा निर्णय जाहीर केला आहे.
विनेशने काय लिहिलं आहे?
“आई माझ्यावर कुस्तीने विजय मिळवला, मला माफ करा, मी हरले …. तुमची स्वप्नं आणि माझं धैर्य, सगळं काही भंग पावलं आहे, यापेक्षा माझ्याकडे जास्त ताकद उरलेली नाही. अलविदा कुस्ती…2001-2024! मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व” विनेशने अशा आशयाची पोस्ट लिहिली आहे. विनेशसोबत कोणतंही षडयंत्र नाही, मात्र जे झालं ते दुर्दैवी; अशी प्रतिक्रिया हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी दिली आहे.
मल्लांना स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीच्या नियमानुसार वजन करावे लागते. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एकदा वजन होते. मल्ल अंतिम फेरीत दाखल झाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वजन केले जाते. कुस्तीगीर ज्या वजनी गटात खेळत असेल, त्याच्या आतच वजन असणे आवश्यक असते. स्पर्धेपूर्वी जेव्हा तिचे वजन केले तेव्हा ते ५० किलोहून अधिक होते. मात्र, तिने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ते कमी केले. विनेशचे वजन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी केले ते ४९.९ किलोग्रॅम होते. विनेशचे वजन बुधवारी सकाळी ५० किलो १०० ग्रॅम भरले. वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले.
विनेशचे वजन उपांत्य फेरीच्या लढतीनंतर केले तेव्हा ते ५२.७ किलोग्रॅम भरले. यानंतर वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले . त्या वेळी प्रशिक्षकही तिच्यासोबत होते. तिने स्वेट सूट परिधान करून दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली; तसेच वजन कमी करण्याचे व्यायामही केले. सौना पद्धतही शरीरातील पाणी कमी करण्यासाठी वापरली. पण वजन पूर्ण कमी झालेच नाही. त्यासाठी तिने केसही कमी केले. शिवाय, सकाळच्या कसरतींनी वजन कमी होईल, असा विश्वास तिला होता. तणावामुळे विनेश रात्रभर व्यवस्थित झोपू शकली नाही. वजन कमी करण्यासाठी बुधवारी पहाटे सहापासूनच विनेशचे प्रयत्न सुरू झाले. तरीही वजन पुरेसे कमी होत नसल्याने स्विमसूट घालून तिने सायकलिंग केले; तसेच ट्रेडमिलवरही सराव केला. नंतर सरावातील सहकाऱ्यासह कुस्तीही खेळली. मात्र, फारसा परिणाम झाला नाही. सकाळी आठ वाजता अंतिम लढतीच्या दिवसाचे वजन करण्यात आले तेव्हा विनेशचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरले. त्या वेळी पथकप्रमुख गगन नारंग; तसेच भारतीय संघाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पार्डीवालाही तिच्यासमवेत उपस्थित होते. स्पर्धेसाठी अपात्र ठरल्यानंतर काही मिनिटांतच ती डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडली होती.
त्यामुळे विनेशला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करावे लागले.