डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १२ ऑगस्ट २०२४
काल (11 ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाली. ही स्पर्धा 26 जुलैपासून खेळवली गेली. जगभरातील 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून एकूण 117 खेळाडूंनी भाग घेतला.
भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकूण 6 पदके जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन कांस्य पदके मिळाली आहेत. कुस्तीतूनही भारताने पदक मिळवले आहे. भारताच्या अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले.
ऑलिम्पिकची स्पर्धा संपताच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नीरज चोप्रा आणि मनू भाकरची आई यांच्यात यामध्ये चर्चा होताना दिसत आहे. मनू भाकरची आई या व्हिडीओमध्ये नीरज चोप्राचा हात आपल्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे. बाहेरील गोंगाटामुळे दोघींमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे जरी कळू शकलेलं नसलं तरी नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे.
नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत त्याच्या लग्नाची चर्चा करत असल्याचं दिसतं असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसर्यानं मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने मग…ठरलं का?, फोडायची का लग्नाची सुपारी ? असं म्हटलं आहे.