नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १२ ऑगस्ट २०२४
अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. तिने लोकसभा निवडणूक लढवली आणि ती खासदार झाली आहे. कंगनानं हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर हल्ला करताना दिसून येते.
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी सरकारला हिंडनबर्ग अहवालावर कोंडीत पकडलं आहे. ज्यामध्ये त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आरोपसुद्धा केला आहे. या मुद्द्यावरुनच कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
यासंदर्भात कंगना रनौतनं एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगना लिहिते की, “राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत. जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्तही करू शकतात, आणि हाच त्यांचा अजेंडा आहे. आमच्या शेअर बाजाराला हिंडनबर्गच्या अहवालानं लक्ष्य केलं, ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं आणि त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”
खासदार कंगना रनौतनं पुढे लिहिते की, राहुल गांधी देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा गांधीजी आणि आता तुम्हाला जशा वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद, अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता कधीही तुम्हाला नेता बनवणार नाही.
रविवारी हिंडेनबर्ग अहवालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ऑफ इंडिया च्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे संस्थेच्या अखंडतेशी ‘गंभीरपणे तडजोड’ झाल्याचे दिसते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय पुन्हा स्वत:हून दखल घेणार का? काँग्रेस नेते गांधी यांनीया मुद्द्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) तपासाला पंतप्रधान मोदी इतके का घाबरतात हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट केली. या पोस्टमधून बरेच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, सरकारसमोर देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे अनेक प्रश्न आहेत. अद्याप सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीच्या अध्यक्षा की गौतम अदानी?