मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ ऑगस्ट २०२४
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा हुरुप वाढवणारी एक बातमी, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुतीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 177 जागांवर महायुतीला अनुकूल परिस्थिती असल्याची बाब समोर आली आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी केवळ 17 जागांवर विजय मिळाला होता. यामध्ये भाजपला ९, शिंदे गटाला ७ आणि अजितदादा गटाला एका जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, ताज्या सर्वेक्षणाकडे पाहाता महायुतीसाठी आशादायक चित्र असल्याची चिन्हं दिसत आहेत.
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या दोन लोकप्रिय योजनांची घोषणा महायुती सरकारने केली होती. यामध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला सरकारकडून 1500 रुपये मिळणार आहेत. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा होऊ शकतो असे दिसते. शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात याचाच इफेक्ट दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरील अंतिम बैठका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झाल्या आहेत. शिंदे गटाकडून 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. तर शिंदे गटाच्या विभागवार बैठका मुंबईतही सुरु आहेत.
महायुतीसाठी राज्यातील 177 विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुकूल वातावरण असले तरी बंडखोरीला लगाम घालण्याचे मुख्य आव्हान महायुतीसमोर असणार आहे. बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी इच्छूक उमेदवारांची मनधरणी करून उमेदवार निश्चित करताना तिन्ही पक्षांची तारेवरची कसरत होणार आहे. कारण, नाराज उमेदवार, उमेदवारी न मिळाल्यास पवार गट किंवा ठाकरे गटाची वाट धरू शकतात. अशावेळी महायुतीचे नेते बंडखोरी टाळण्यासाठी काय रणनीती आखतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघातील समन्वय व्यवस्थित नसल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संघ भाजपसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजप आणि संघात लोकसभा निवडणुकीत समन्वय पाहायला मिळाला नव्हता. भाजपला याचा फटका राज्यात बसला होता. तसा प्रकार विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी संघ आणि भाजपमध्ये महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी अतुल लिमये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका येत्या महिन्यातभरात होणार आहेत.