भंडारा प्रतिनिधी :
दि. १४ ऑगस्ट २०२४
काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारे भंडाऱ्यातील भाजपचे माजी नेते शिशुपाल पटले यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे. 15 किंवा 16 ऑगस्टला मुंबईत शिशुपाल पटले हे काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. विदर्भातील काँग्रेस पक्षाची ताकद शिशुपाल पटले यांच्या पक्षप्रवेशामुळे आणखीनच वाढणार आहे. भंडारा, गोंदियातील भाजपच्या ताकदवान नेत्यांपैकी एक म्हणून शिशुपाल पटले हे ओळखले जात होते. त्यामुळेच शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षातील नियोजित पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. भाजपला विदर्भात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. 10 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विजय मिळवला होता.
त्यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळेस भाजपच्या नेत्यांनी पटले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिशुपाल पटले हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भाजपसाठी फार मोठा झटका मानला जात आहे. पोवार समाज भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद शिशुपाल पटले यांनी भूषवले होते. विशेष म्हणजे 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटलेंनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.
शेतकरी, बेरोजगार, बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तुमसर विधानसभा मतदारसंघातील 12 गावांना सिंचन व्यवस्था आदी प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून पटले यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सर्वसामान्य नागरिकांना, महागाई, बेरोजगारी, वीजेचे अवास्तव वाढलेले दर, यामुळं जगणं कठीण झालं आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा माफक दर आणि नैसर्गिक आपत्तीत वारंवार होणारं नुकसान यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा अधांतरीच आहे. उन्हाळ्यात झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही, पीक विम्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. असं असूनही राज्य सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याचे सांगत शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता.
शिशुपाल पटले यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला घरचा आहेर दिला होता. जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले, असे त्यांनी म्हटले होते. भाजपमध्ये सध्या जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. तिच्यात लोकशाहीचा अस्त झाला आहे. भाजपा आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील राहिली नाही. भाजपला आता खऱ्या कार्यकर्त्यांचा विसर पडू लागला आहे. पक्षाला कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत नाही, असा सणसणीत टोला शिशुपाल पटले यांनी भाजपला लगावला होता.