मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (२४ ऑगस्ट) एक दिवसीय महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकास आघाडीच्या प्रमुख मित्रपक्षांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होतील, अशी ग्वाही दिली.
शाळेच्या शौचालयात बालवाडीच्या दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली १७ ऑगस्ट रोजी एका शाळेच्या परिचारकाला अटक झाल्यानंतर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जनक्षोभ तीव्र झाला असून अनेकांनी पीडितांना त्वरीत न्याय देण्याची मागणी केली आहे.
आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून महाविकास आघाडीचा बंद हा बदलापूरच्या घटनेला थेट प्रतिसाद आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील वाढत्या असंतोषावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
बंद असूनही २४ ऑगस्टरोजी शाळा, महाविद्यालये, बस किंवा मेट्रो बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शैक्षणिक संस्था नेहमीप्रमाणे सुरू राहतील आणि बस आणि मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक सेवा विनाअडथळा सुरू राहाण्याची शक्यता आहे.
तसेच 24 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत, मात्र बंदऐवजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने त्या बंद राहाणार आहेत.