जालना प्रतिनिधी :
दि. २९ ऑगस्ट २०२४
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, राज्य सरकारानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मनोज जरांगे पाटील आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही ठाम आहेत. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर सरकारला 29 ऑगस्टची दिलेली डेडलाईन आज पूर्ण होत आहे.
आज अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. 29 ऑगस्ट 2023 ला म्हणजे वर्षभरापूर्वी जरांगे यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन शहागड येथे केलं होतं. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनाला उपस्थित होते. त्यानंतरही सरकारनं मागण्या मान्य न केल्यानं जरांगे यांनी याच दिवशी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केलं होतं. या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं असून, या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी 123 गावांची बैठक बोलावली आहे. आरक्षणाच्या भविष्यातील लढ्यावर या बैठकीत चिंतन आणि मंथन केलं जाणार आहे.
राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मनोज जरांगे पाटील, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर ठाम आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे. ओबीसी समाजानं, आमच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात यातूनच राज्यात अनेक ठिकाणी संघर्ष देखील पाहायला मिळाला. आज अंतरवाली सराटीमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली आहे, ते या बैठकीत काय बोलणार हे पाहाणं महत्त्वाचं असेल.