हरियाणा प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार आणि दिग्गज नेत्या कुमारी शैलजा यांच्या कथित नाराजीची सर्वत्र चर्चा होत आहे. बसपा आणि भाजपने त्यांना पक्षात येण्याची ऑफरही दिली आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न बनवल्याने आणि विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्या नाराज असल्याचीही चर्चा होती. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत त्यांनी, आपली इच्छा असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदाची इच्छा नाही, असे म्हणता येणार नाही असे त्या म्हणाल्या.
आजतकच्या कार्यक्रमात कुमारी शैलजा म्हणाल्या, निवडणुकीत तिकीट न देणे हा पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्रीपदावरील दाव्याबाबत त्या म्हणाल्या, दावा कोणीही करू शकतो. ज्येष्ठतेचा स्तरही आहे. मी ज्या गोष्टी बोलले त्याचे परिणाम मला भोगावे लागले. त्या पुढे म्हणाल्या, काही लोक माझ्या बोलण्याला घाबरत असतील.कुमारी शैलजा म्हणाल्या, आमचा एक प्रवास आहे, काही लोक आहेत जे आमच्यासोबत चालले आहेत. इथपर्यंत पोहोचायला आम्हाला तीन पिढ्या लागल्या. पण हे सर्व फक्त स्वतःसाठी नाही. संपूर्ण समाजासाठी एक दृष्टी आहे आणि हरियाणामध्ये एक दृष्टी आणण्याची इच्छा असू शकते. ती माझी इच्छा होती आणि आजही ती माझी इच्छा आहे. त्यामुळे आता माझी इच्छा नाही असे मी म्हणणार नाही.
त्या म्हणाल्या, मी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की, आम्ही कोणताही राजकीय मार्ग ठरवू, अनेक लोक आमच्यासोबत येतात. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. शैलजाचा लढा केवळ स्वतःसाठी नाही तर दुर्बल घटकांसाठी आहे. हे केवळ मी ज्या समाजात जन्मले त्या समाजाबाबत नसून स्त्रियांबाबतही असेच मत असायला हवे.
भाजप आणि बसपाच्या ऑफर्सवर शैलजा काय म्हणाल्या?
भाजप आणि एमएल खट्टर यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या ऑफरवर त्या म्हणाल्या, आज जे काही नेते भाजपवर भाष्य करत आहेत त्यांच्यापेक्षा माझे राजकीय आयुष्य खूप मोठे आहे. अशा परिस्थितीत मला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. माझा मार्ग कसा ठरवायचा हे मला माहीत आहे.भाजप असो वा अन्य पक्ष, माझ्याबद्दल केवळ गैरसमज पसरवले जात आहेत. शैलजा म्हणाल्या की, त्यांच्या नसात काँग्रेसचे रक्त आहे. जसे माझे वडील तिरंग्यात लपेटून आले होते, त्याचप्रमाणे शैलजाही तिरंग्यात लपेटून जाईल.