डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२४
भारतानं बांदलादेशची पहिल्या कसोटी सामन्यात त्रेधातिरपीट उडवली. मोठ्या जोशातपाकिस्तानला हरवून बांगलादेशची टीम भारतात आली होती. पण पहिल्याच मॅचमध्ये भारतानं त्यांची गुर्मी उतरवली. भारतानं २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आणि सद्य परिस्थिती पाहाता टीम इंडिया दुसरी मॅच सुद्धा जहज जिंकेल असे वाटते. दरम्यान एक विशेष गोष्ट पाहायला मिळते आहे ती म्हणजे भारताच्या विजयावर पाकिस्तानी लोक आनंद व्यक्त करताहेत.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशचा दारूण पराभव केला. बांगलादेशसमोर या मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये तब्बल ५१५ धावांचं आव्हान होतं. भरीत भर म्हणून मॅच संपायला ३ दिवसांचा अवधी होता. त्यामुळे अर्थातच मॅच काही ड्रॉ होण्याची शक्यता नव्हती आणि भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ५१५ धावा होणं तर फारच कठीण होतं. त्यामुळे शेवटी बांगलादेशनं सपशेल लोटांगण घातलं आणि भारताचा २८० धावांनी विजय झाला. मात्र या विजयावर भारतापेक्षा जास्त खुश पाकिस्तान झालेला पाहायला मिळतंय. भारत जिंकताच त्यांनी एकच जल्लोष केला. चला पाहूया पाकिस्तान मीडियानं दिलेल्या काही अवाक् करणाऱ्या प्रतिक्रिया.
भारतात येण्यापूर्वी बांगलादेशनं पाकिस्तानला २-० नं कसोटी मालिकेत हरवलं होतं. पाकिस्तानी लोक त्यामुळे आधीच त्यांच्यावर डुख धरून होते. त्यातच बांग्लादेशनं भारताला सुद्धा पाकिस्तानसारखं २-० ने हरवणार असं मोठ्या गुर्मित म्हटलं होतं. अर्थात त्यामुळे टीम इंडियाला काहीच फरक पडलेला नव्हता. कर्णधार रोहित शर्मानं तर यावर त्यांची फिरकी सुद्धा घेतली होती. पण या गोष्टीमुळे पाकिस्तानी लोक मात्र खवळून उठले आणि बांग्लादेशवर टीकेची झोड त्यांनी उठवली. कारण सातत्यानं पाकिस्तानी पाकिस्तानी टीमची खिल्ली उडवली जात होती. भारत जिंकल्यानंतर मात्र जणू त्यांनी आपलाच बदला घेतलाय असं सेलिब्रेशन पाकिस्तानी आता करताहेत. पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूही बांगलादेशचा पराभव सेलिब्रेट करताहेत.
या मॅचमध्ये बांगलादेशनं टॉस जिंकून भारताला प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं होतं. यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये भारतानं ३७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यात बांगलादेश अगदीच कमी पडलं आणि अवघ्या १४९ धावांवर ते गडगडले. भारताला २२७ धावांची आघाडी त्यामुळे मिळाली आणि मग दुसऱ्या इनिंगमध्ये भारतानं पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी करून २८७ धावा केल्या. पण आधीची २२७ धावांची आघाडी जमेला धरून बांग्लादेशला जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये ५१५ धावा कराव्या लागणार होत्या. सुरूवातीला या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी थोडाफार प्रयत्न जरी केला, तरी पण शेवटी भारताच्या अनुभवी गोलंदाजीसमोर त्यांनी अक्षरशः गुडघे टेकले, अन् शेवटी २८० धावांनी भारतानं दणदणीत विजय मिळवला.