पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २४ मे २०२१
मंगळवेढा तालुक्यासाठी महत्वपुर्ण आणि स्वर्गिय आमदार भारत नाना भालके यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात नुकतेच दाखल झाले आहे. आसबेवाडी ता. मंगळवेढा येथे हे पाणी दाखल झाल्यावर शेतकरी बांधव व बालगोपाळांनी भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जलपुजन केले. हे जलपूजन करुन शेतक-यांनी भालके यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिलेला हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या कडा ओल्या झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर येत आहेत.
जसे भारत नाना भालके यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पुर्ण झाले तसेच चातका प्रमाणे पाण्यासाठी तीन तीन पिढ्या वाट पाहणा-या लहान थोरांपासून सर्वांनी आनंद व्यक्त केला. भालके यांच्या पश्चात त्यांचे अश्वासन पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. तूम्ही आमचा उमेदवार निवडून द्या आम्ही पाणी शेतात आणायची व्यवस्था करतो असा शब्द नुकत्याच झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने अजित पवार व जयंत पाटील जनतेला दिला होता. मात्र, शेवटच्या दोन दिवसात झालेल्या चमत्कारामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा अल्पशा मतांनी पराजित झाला. तरी ही जयंत पाटील यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला.
जयंत पाटील यांनी भारत नाना भालके यांचे व शेतकरी बांधवांचे स्वप्न पूर्ण केल्याची तालुकाभर चर्चा रंगली आहे. या भागातील शेतक-यांच्या जीवनात पुन्हा गंगा आली आता दुष्काळ हटणार अशी भावना निर्माण झाली आहे. अखेर, भारत भालके यांच्या पाश्चत तालुक्यातील पाणी प्रकल्प मार्गी लागत आहेत, याचेच या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना समाधान असल्याचे त्यांच्या चेह-यावरुन दिसून येत होते.