पुणे प्रतिनिधी :
दि. २७ सप्टेंबर २०२४
नितीन गडकरी यांनी मुंबई – पुणे प्रवासाचं अंतर कमी करणार्या नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. हा मार्ग कसा असेल? कधी सुरू होणार? याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
मुंबई – पुणे या महामार्गावरुन अनेक प्रवासी प्रवास करत असतात आणि मुंबई ते पुणे या मार्गावरील प्रवासासाठी सध्या साधारण चार तासांचा वेळ लागतो. मोठी वाहतूककोंडी देखील या मार्गावर होते. वाहतूककोंडी झाल्यावर चार तासांच्या प्रवासासाठी आणखी तासभरदेखील या मार्गावर लागतो. पण आता यावर जबरदस्त उपाय शोधून काढण्यात आला असून लवकरच मुंबई – पुणे हा प्रवास प्रवाशांना केवळ दीड तासांत पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई – पुणे या नव्या मार्गाबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना ही माहिती दिली.
गडकरींनी आताच्या मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेबाबत नव्या महामार्गाविषयी माहिती देण्याआधी सांगितलं, “ज्यावेळी मुंबई – पुणे महामार्ग बांधला त्यावेळी तो बीओटी तत्वावर बांधण्यात आला होता. बीओटी तत्वावर चा अर्थ म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा. आमच्याकडे हा महामार्ग बांधताना पैसे नव्हते. त्यामुळेच तो बीओटी तत्वावर उभारला गेला होता.”
“वाहनांची गर्दी आता या मार्गावर प्रचंड वाढली आहे. मार्गावर नेहमीच मोठी वाहतूककोंडी पाहायला मिळते. मी या मार्गावर काही दिवसांपूर्वी प्रचंड वाहतूककोंडी पाहिली आणि त्याच दिवशी ठरवलं, की इथे नवीन मार्ग, रस्ता बांधायचा” असं गडकरी पुढे म्हणाले.
असा असेल नवा मार्ग –
नवा मार्ग हा मुंबई – पुणे प्रवास करताना मुंबईतील अटल सेतूवरुन उतरुन तिथून पुढे पुण्याच्या रिंगरोडपर्यंत असेल. तिथून पुढे बंगळुरूपर्यंत हा मार्ग जाईल. ४५ कोटी रुपये खर्च या मार्गासाठी येणार आहे. हा नवा महामार्ग बांधण्याच्या कामाची सुरुवात सुद्धा झाली आहे.
मुंबई – पुणे नवा महामार्ग कधी सुरू होणार ?
सुरुवातीला मुंबई – पुणे हा जुना हायवे असताना या महामार्गावर मोठी गर्दी, वाहतूककोंडी होत असल्याने या हायवेवर मोठा ताण येत असे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून मुंबई – पुणे एक्सप्रेसवे उभारला. आता त्यावरही मोठी वाहतूककोंडी व्हायला लागल्याने पुन्हा हा नवा मुंबई – पणे हायवे उभारण्यात येत आहे.
अटल सेतूवरुन उतरुन पुढे पुण्याच्या रिंगरोडपर्यंत आणि तेथून पुढे बंगळुरूपर्यंत जाणाऱ्या या महामार्गाच्या कामाचं पहिलं पॅकेज येत्या एका महिन्यात सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर या महामार्गाचं काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होऊन मुंबईच्या अटल सेतूवरुन पुण्यात पोहोचता येईल आणि हे अंतर असेल केवळ दीड तास!