पुणे (बारामती) प्रतिनिधी :
दि. ०३ ऑक्टोबर २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी म्हणजेच अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड प्रकरण या सगळ्यांवर उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. बारामतीत पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते. “राज्यात तथा बारामतीत जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नकोत. याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे” असे ते म्हणाले. आज सकाळी बारामतीमधल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक झाली.
अजित पवारपत्रकार परिषदेत म्हणाले की, “शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन या अभियानाअंतर्गत केलं जाणार आहे. कारण सध्या युवकांचं प्रबोधन करण्याची फार गरज आहे. या अभियानात पंचशक्ती आहे. शक्तीबॉक्स प्रकारची एक तक्रारपेटी आहे. अनेक महिला तसेच मुलींना येणार्या अडचणींबाबत म्हणजे मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड हे प्रकार किंवा कधीकधी चावटपणे मुलं दुसऱ्याच फोनवरुन फोन करतात अश्या गोष्टी. त्यामुळे त्यांचा त्या मोबाइलवर नंबर येत नाही किंवा त्यांची ओळखही पटत नाही. असे काही प्रकार चालतात, पीडित महिला किंवा मुलींना त्यामुळे मनमोकळेपणाने ही गोष्ट सांगता येत नाही. आपलं म्हणणं किंवा आपली तक्रार अशा पीडितांना मांडता यावी, यासाठी परिसरातील शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या, हॉस्पिटल, सर्व सरकारी कार्यालये, कोचिंग क्लासेस, एस.टी.स्टॅंण्ड, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफिस याठिकाणी पोलिसांमार्फत शक्तीबॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल.”
“सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड यांसंबंधीच्या तक्रारी, तसेच गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादींचा साठा सापडल्यास याबाबतची गोपनीय माहिती तक्रारपेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत सदरची पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्यात येईल. कारण बारामती शहर वाढते आहे. जिल्हा म्हणूनच आता बारामतीची ओळख झालेली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर बारामतीचा नंबर आता लागतोय. हे लक्षात घेता, या सर्व गोष्टी बारामतीत होत असताना शहरातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं अतिशय गरजेचं आहे. याला देखील नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे”, असं आवाहनसुद्धा अजित दादा यांनी केलं.
“बऱ्याच घटना शहरात घडत असतात. याबाबत तक्रार किंवा आवाज उठवायला सामान्य माणूस घाबरतो. यावर उपाय म्हणूनच आपण हे ‘शक्ती अभियान’ तथा ‘शक्तीबॉक्स तक्रारपेटी अभियान’ राबवत आहोत. यासाठी एक शक्तीनंबर देखील तयार केला आहे. त्याला “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” असं स्लोगन दिलंय. तो नंबर आहे ‘९२०९३९४९१७’ आणि या क्रमांकाची सेवा सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फोन किंवा मेसेज करुन या नंबरवर तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांची (तक्रारदारांची) नावे देखील गोपनीय ठेवण्यात येतील. सदर पथकाचा मोबाईल बारामतीमधल्या शाळा, कॉलेज, कंपनी आणि हॉस्पिटल तसेच सरकारी व खासगी संस्था, यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सहज दिसेल अश्या पद्धतीने लावून त्याद्वारे मिळालेल्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल”, असं अजित पवार म्हणाले.