सासवड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २४ मे २०२१
म्युकोरमायकोसीस अर्थात ब्लॅक फंगस या आजाराशी लढण्यासाठी पुरंदर तालुका सज्ज होत असल्याचे चित्र आहे. पोस्ट कोविड रुग्णांना होत असलेल्या या घातक आजाराने तालुक्यात शिरकाव केल्यानंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सावधानतेचा इशारा देत या आजाराशी लढण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन जनतेला केले होते. हा आजार खर्चिक असल्याने गावांनी आपल्या गावातील रुग्णांसाठी घराघरातून निधी उभा करावा अशी संकल्पना शिवतारे यांनी मांडली होती.
शासन यंत्रणा, राजकीय नेते यांचं सहकार्य होईलच पण खर्च मोठे असल्याने लोकसहभागाशिवाय या आजाराशी झुंज देणं बहुतांश लोकांना शक्य नाही. शासन जनआरोग्य योजनेतून दवाखान्याचा खर्च करीत असले तरी या आजारात औषधं व इंजेक्शनचा खर्च दवाखान्याच्या खर्चापेक्षा मोठा आहे. पुरंदर तालुक्यात आजघडीला जवळपास म्युकोरमायकोसीसचे ५ ते ६ रुग्ण आहेत. कोळविहीरे व पांगारे येथे प्रत्येकी एक रुग्ण दगावलादेखील आहे. हा आजार तत्काळ ओळखल्यास त्यावर मात करणे सहज शक्य होते. पण लपवून ठेवल्यास किंवा अंगावर रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. अनेक रुग्णांनी वेळेत दवाखान्यात धाव न घेतल्याने त्यांना डोळा किंवा अन्य एखाद्या अवयवाला मुकावे लागले आहे. कोरोनातून बरे झाल्यावर दात दुखणे, गाल सुजणे, डोळे दुखणे किंवा सतत पाणी येणे, डोकं सतत दुखणे अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब कान, नाक-घसा तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक चाचण्या करणे गरजेचे आहे.
या गावांनी घालून दिला आदर्श
पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी व एखतपूर-मुंजवडी या गावातील दोन तरुणांना हा आजार झाला. दोनही गावांनी वर्गणी करत ग्रामनिधी उभा केला. माजी मंत्री शिवतारे यांच्या कार्यालयातूनही सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करण्यात आले. दोनही रुग्णांना प्रत्येकी अडीच ते तीन लाख रुपयांची मदत या माध्यमातून उभी राहिली.
गावाची एकीच तारणहार ठरेल – शिवतारे
ब्लॅक फंगससारखा आजार नेमका कुणाच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यात आपल्याला गावाची एकजूटच तारणार असल्याचे लक्षात घेऊन सर्वांनी अशा ग्रामनिधीमध्ये योगदान द्यावे असे आवाहन श्री. शिवतारे यांनी केले आहे.