मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० नोव्हेंबर २०२४
अनेक उमेदवारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. याचाच आधार घेत संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अनेक उमेदवारांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यामध्ये भाजपचे पराभूत नेते राम शिंदे यांचाही समावेश आहे. खरंच काही घोटाळा या निकालामध्ये आहे का? अशी चर्चासुद्धा दबक्या आवाजामध्ये आता होऊ लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक ९५ वर्षाच्या बाबा आढाव यांनी याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. बाबा आढाव यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा राज्यभरात होत असून त्यांच्या आंदोलनाचा आज (शनिवार) तिसरा दिवस आहे. शरद पवार यांनी पुण्यात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली. यादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा राज्यभरात होताना दिसत आहे. विरोधक, लोकसभेच्या निकालानंतर महायुतीने वन साईड बाजी कशी मारली अशी टीका करत आहेत. यावरून ईव्हीएमवर शंका उपस्थित करत महायुती आणि निवडणूक आयोगावर विरोधकांनी टीका केली आहे. मात्र समाजसेवक अण्णा हजारे यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
अण्णा हजारे झोपलेले असून त्यांना शांत झोप लागलेली आहे. त्यांना महाराष्ट्रात आणि देशात जे प्रकार चाललेले आहेत ते दिसत नाहीत. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अण्णा हजारे यांना इतकी शांतपणे झोप कशी लागू शकते हा संशोधनाचा विषय आहे. भले अण्णा हजारे झोपले पण ९५ वर्षाचे बाबा आढाव मैदानात उतरल्याचं शुक्रवारी बोलताना राऊत म्हणाले होते.
निवडणूक आयोग, न्यायालयाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय तर आजिबात ऐकायला तयार नाही. ईव्हीएमसंदर्भातील याचिका दोन मिनिटात ते धुडकावून लावलीत. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की, जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही येत नाही आणि पराभव झाला की आमच्याकडे तक्रार घेऊन येता. परंतु आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की, मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. मग भारतातच EVM चा अट्टाहास का? मोदी-शहांची जर एवढी ताकद आहे तर ते का घाबरतायेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला.