मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ डिसेंबर २०२४
राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे तरीही मुख्यमंत्री पदाचं घोंगडं अद्यापही भिजत पडलं आहे. सत्तास्थापनेची तारीख ठरली आहे पण मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती ठीक नसल्याने सर्व बैठका रद्द होत असून चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावरून संजय राऊतांनी वेगळाच संशय घेतला आहे. दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारत आहेत आणि रुसवे फुगवे करू शकत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
“काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजप करत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणं म्हणजे फार मोठा विनोद असणार आहे. लोकशाहीचे संकेत हे सरकार पायदळी तुडवत आहे. मतदान केलेल्यांना आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक साशंक आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे. आज मारकडवाडीत १४४ कलम लावलंय. लोकशाही मार्गाने जे मतदान करू इच्छितात त्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात अजून सरकार यायचंय. तसाही त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय. पण विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी आहेत, असं मतदारांना वाटतंय. जिंकून सुद्धा फेरमतदान होत आहे, कारण मतदान कमी झालंय”, असं संजय राऊत म्हणाले.
अंजली दमानिया यांनी, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं ट्वीट केलंय, याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आलं असताना ते म्हणाले, “विरोधी पक्ष संपवण्याचा या देशात प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे महाराष्ट्रात सुरू आहेत, त्यामध्ये दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे असं मला वाटतं . अशाप्रकारचं धाडस दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे करू शकत नाही. कारण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत नाहीय.”
“ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडून ते पळून गेले. तीन वर्षांत त्यांना असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला अश्याप्रकारे डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत? हा खेळ दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात करते आहे आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे”, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलंय.
ते पुढे म्हणाले, “शक्तीमोचक वगैरे एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी नाहीय. कोणीही काही फसलं नाहीय. हा डोंबाऱ्याचा खेळ दिल्लीच्या सूचनेनुसार सुरू आहे. दिल्लीतून डमरू वाजतोय. एकनाथ शिंदे असा डाव, दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय करू शकत नाहीत.”