मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ डिसेंबर २०२४
महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही घटना त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे, याबद्दल माहिती दिली. तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेणार? याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी अतिशय चपखल उत्तर दिले .
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते. यावरून फडणवीस यांना बरेच ट्रोलही करण्यात आले होते. पण आता ते खरोखर पुन्हा आले आहेत, यावर बोलताना त्या म्हणाल्या, “जेव्हा आपल्याला काही साध्य करायचे असते. तेव्हा अर्जुनासारखे, समोर केवळ लक्ष्य असले पाहीजे. खुर्चीसाठी त्यांना पुन्हा यायचे नव्हते. त्यांना पुन्हा यायचे होते कारण त्यांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतात, ते इतर कुणी करू शकत नाही. हा विश्वास बाळगूनच ते पुन्हा आलेले आहेत, याचा मला आनंद वाटतो.”
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिला कोणता निर्णय घेणार? असाही एक प्रश्न यावेळी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे मार्मिक उत्तर देताना त्या म्हणाल्या, पहिला निर्णय नेमका कोणता असेल, याची मला कल्पना नाही. पण तो निर्णय नक्कीच लोकहिताचा असेल, हे मी ठामपणे सांगू शकते.