नागपूर प्रतिनिधी :
दि. १२ डिसेंबर २०२४
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकालाचं चित्र स्पष्ट होईपर्यंत मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात ‘मविआ’चा दारूण पराभव झाल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले. मुख्यमंत्रीपद तर सोडा पण आता आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ देखील नाहीये.
अशातच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
याबाबतच्या हालचाली देखील काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून याबाबतचा तोंडी प्रस्ताव देखील ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसकडून दिला गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मागील सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे होते.
विधानपरिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे प्रत्येकी ७ सदस्य आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ सदस्य आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या सदस्यांचं विधानपरिषदेतील संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक अधिकार मिळवून देणारे पद असल्यामुळे हे पद ज्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाला बळ मिळतं. त्यामुळेच काँग्रेस दोन्ही सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यास तयार नाही. तर याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.