हैदराबाद प्रतिनिधी :
दि. १३ डिसेंबर २०२४
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा २: द रुल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथे या सिनेमाचा प्रीमिअर शो झाला. या प्रीमिअरसाठी अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच या प्रकरणी अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आणि त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतलीये. अशातच अल्लू अर्जुनसाठी एकाच वेळी आता दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत.
या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्करने माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितलं की, ‘अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.’ त्याचबरोबर तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामिन मंजूर केला आहे.
दरम्यान, आरटीसी एक्स रोड येथील संध्या थिटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन प्रेक्षकांच्या मृत्यूनंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि एक कर्मचारी अशा तिघांना अटक केली होती.
‘संध्या थिएटरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून यात मृत्युमुखी झालेल्या महिलेच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसंच या कठीण काळात मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी स्वतःला एकटं समजू नये, मी स्वतः त्यांची भेट घेईल. मी त्यांना मदत करेन’ असं अल्लू अर्जुनने व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं आणि त्याचबरोबर आर्थिक मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे.