बीड प्रतिनिधी :
दि. १४ डिसेंबर २०२४
बीड जिल्ह्याच्या केजमधील मस्साजोग हे गाव प्रचंड चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यानंतर लोकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि आरोपींवर त्वरित कारवाईची मागणी केली. अश्यातच मनोज जरांगे पाटील यांच्यापासून राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळायला सुरुवात झाली. राजकीय आरोप प्रत्यारोप यांची वावटळ उठली. अशातच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतल्याने राजकीय वाद शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्याबरोबरच वाल्मिक कराड आणि विष्णु चाटे यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आता या खंडणी प्रकरणाचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का? असाही प्रश्न लोक उपस्थित करू लागले आहेत.
९ डिसेंबरला मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगला चालले होते. यावेळी एका टोलनाक्याजवळ त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी लोकांची माहिती आणि पोलिसांना मिळालेले सुगावे यांच्या आधारे जयराम साठे, महेश केदार आणि प्रतीक घुले या तीन आरोपींना अटक करण्यात आली. पण अद्याप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत.
अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्याआधी त्यांना अतिशय वाईटरित्या टॉर्चर करण्यात आल्याचे दिसून आले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. क्षीरसागर म्हणाले की, देशमुख यांचा मृतदेह पाहावत नव्हता. एखाद्या जनावराचेही इतके हाल केले जात नाहीत. पोलिस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल करायला गेल्यावर आमच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही असे माध्यमांशी बोलताना संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी आमची तक्रार दाखल केली नाही आणि सहकार्यही केलं नाही असंही ते पुढे म्हणाले.
संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या ऑफिसमध्ये झालेल्या वादातून झाली असावी असा अंदाज बांधला जातो आहे. मस्साजोगमध्ये आवादा या कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. इथेच त्यांचं ऑफिसदेखील आहे. काही दिवसांपूर्वी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि टाकळी गावातील त्यांचे सहकारी इथे आले होते. त्यांनी ऑफिसमधील कर्मचार्यांना धमकावायला सुरुवात केली आणि त्यानंतर या सगळ्याचं पर्यवसान वादात झालं. आवादा कंपनीला जागा मिळवून देण्यात संतोष देशमुख यांनी मदत केली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. मिळालेल्या महितीनुसार त्यावेळी मस्साजोगमध्ये पुन्हा राडा झाला. टाकळी आणि मस्साजोगमधील तरुणांमध्ये झालेलं हे भांडण व्हीडिओच्या माध्यमातून व्हायरल झालं आणि हीच गोष्ट टाकळीमधील तरुणांच्या जिव्हारी लागली असं सांगण्यात येतं आहे. या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख यांनी मस्साजोगचा तरुण आणि कंपनीच्या बाजूनं मध्यस्थी केली होती. या सगळ्याचा राग मनात धरूनच संतोष देशमुख यांची हत्या केली गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.